अहोऽऽऽ!

“अहोऽऽऽ!. काय उच्छाद आहे ह्या माणसाचा.

अहोऽऽऽ!.मी काय म्हणते… काय करताय बाथरूमच्या वर जाऊन. तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? असले माकडचाळे का करता ह्या वयात? रिटायर होउन तुम्हाला २ वर्षे झालीत त्यावरून तरी स्वतःच्या वयाच्या मर्यादा ओळखा”, मालतीबाई.

अहो, “वयाचं सोड गं. मला सांग मी आता खाली कसा उतरु?”

मालतीबाई, “मला आधी सांगा; तुम्ही वर चढलात कसे?”

अहो,”आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी साहेबांनी मदत केली. त्यांनी खालच्या बाजूने टेकू दिला.”

मालतीबाई, “मग बोलवा त्यांना आता. कुठे गायब झाले? हे मुळीक आहेतच फक्त कामापुरते. सेक्रेटरी म्हणे. खरंतर आपल्या सोसायटीच नाव ‘श्री सोसायटी’ नसून ‘सौ सोसायटी’ पाहिजे होतं. सगळ काम बायकाच करतात आणि सोसायटीतले सगळे पुरुष काम वाढवायचं काम करतात. सगळेच कसे हो तुम्ही एकजात अर्धवट?”

मालतीबाईंचा हा संवाद हातामधे पळी घेऊन चालला होता. कमरेला पदर आणि एक छोटा रुमाल खोचलेला, एका हाताला कणीक लागलेली आणि एका हातामधे स्टीलची पळी. वय तसं साठीच पण अगदी तरतरीत. अतिशय कष्टाळू. कायम घरामधे काहीना काही काम चालूच असणार. बाथरूमच्या माळ्यावर मालतीबाईंचे यजमान वामनराव अडकून बसलेले. त्यांच्याकडे पाहत मालतीबाईं त्रागा करीत होत्या.

वामनराव,”अगं खालूनच काय गप्पा मारते. मला खाली घ्यायचं काही तरी कर”

मालतीबाई, “मी सांगितलं का वर चढायला ?. कशासाठी गेला तुम्ही त्या माळ्यावर ?”

वामनराव,”मुळीकांना आपला चौरंग पाहिजे होता. मुळीक होते माझ्याबरोबर पण मी जसा थोडा आत शिरलो तसे ते कुठे गायब झाले कुणास ठाऊक”.

मालतीबाई,”अहो! हॉलमधल्या दिवाणमधल सामान का काढलयं सगळं बाहेर. सगळा पसारा करुन ठेवलाय”

वामनराव,”मला वाटलं चौरंग तू दिवाणमधे ठेवला असशील पण नाही सापडला”

मालतीबाई,”एवढी उलथापालथ करण्यापेक्षा मला काय झाल होतं विचारायला? मीच ठेवलाय तो बाहेर गॅलरीमध्ये”

वामनराव,”बरं बरं. माझी आता मान दुखायला लागली आहे इथे. सरळ बसता येत नाही. कर्णिकांकडून घोडा आण मला इथून उतरायला”

मालतीबाई,”घोडा? त्यांनी कधी घेतला घोडा? तिस-या मजल्यावर कसा आणला असेन त्यांनी?”

वामनराव निर्विकार चेह-याने दोन पायावर मान वाकडी करुन मालतीबाईंकडे बघत होते.

मालतीबाई,”काय पण.. घोडा आण म्हणे. त्या मुळीकांनाच सांगा. ते आणतील तुमच्यासाठी घोडा. तुम्ही नीट सांगितलं ना तर ते गाढवसुध्दा आणतील”

वामनराव,”अगं घोडा म्हणजे मोठा स्टूल. त्यांच्या घरी काम चाललंय रंगाचं तर तो मोठा स्टुल घेऊन ये.”

मालतीबाई,”मी अजिबात घेऊन नाही येणार. तुमचे उद्योग तुम्हीच निस्तरा. वाजले किती बघा. भरपूर काम आहे अजुन मला”

असं म्हणत मालतीबाई स्वतःशी बडबड करीत स्वयंपाक घरात गेल्या. वामनराव तसेच बाथरूमच्या माळ्यावर आपली मान वाकडी करुन बसून राहिले. थोड्यावेळाने मुळीक तो मोठा स्टुल म्हणजेच ‘घोडा’ घेउन बाथरुम पर्यंत आले. त्यांना आणि त्या घोड्याला बघुन वामनरावांना अगदी हायसं वाटलं. वामनराव एकदाचे खाली उतरले.

वामनराव,”कुठे गेला होता तुम्ही सेक्रेटरी साहेब. आमच्या हिने माळ्यावरचं फैलावर घेतलं ना मला. तुम्ही निघा लगेच मी पोहचवतो घोडा नाहीतर तुमच काही खरं नाही”.

मुळीक,”का? काय झालं?

“तुम्ही मला असे वर अडकवून गेला. आता आमच्या मॅडम ह्याच घोड्यावरून तुमची वरात काढतील”

मुळीक,”अहो मालतीबाईंनीच सांगितलं मला घोडा घेऊन यायला. अन मी काही तुम्हाला सोडून नाही गेलो, माझ्या मुलीने आवाज दिला म्हणून बाहेर गेलो पण परत यायला थोडा उशीरच झाला”.

वामनराव,”मुलीवरुन आठवलं. आमची पण मुलगी, नातु आणि जावई येणार आहेत आज. त्याचीच तयारी चाललीये किचनमधे.”

तेवढ्यात मालती बाई एका हातात चौरंग घेऊन आल्या. दोघांनी लगेच आपले बोलणं बंद केले आणि मालतीबाईंकडे खजील नजरेने मनातल्या मनात हसत बघायला लागले.

मालतीबाई,”झाली आजची सर्कस? आणि काय हो मुळीक चौरंग पाहीजे होता तर मला विचारायचं होतं. आमच्या ह्यांच अजिबात लक्ष नसतं. ह्या चौरंगासाठी सगळ घर खाली घेतलयं. सगळा पसारा.”

वामनराव,”अगं ह्यांच्या घरी ब्रम्हकमळ आलंय त्याचीच पुजा आहे. त्यासाठीच लागतोय चौरंग”

मालतीबाई,”बरं. बरं. मुळीकसाहेब तुम्ही हा चौरंग घ्या. आणि हा घोडा सुद्धा कर्णिकांच्या घरी बांधा. हे नाही सोडवायला यायचे. काम आहेत यांना आता.”

मुळीकांना मालतीबाईंच्या बोलण्यातला तुसडेपणा जाणवला. तसा वामनरावांना सुद्धा जाणवला पण त्यांना आता सवय झाली होती. मुळीकांनी चौरंग घेतला आणि म्हणाले,
“होय. होय. मी घेऊन जातो घोडा. पहिला चौरंग पोहचवतो घरी”

मालतीबाई,”आणि हा घोडा केंव्हा नेताय. आमच्या घरात अडगळ नको. आमची वसुधा, शंभु आणि जावई सुद्धा यायचे आहेत आज”

मुळीक्,”लगेच घेऊन जातो वहिनी. नाही ठेवत तुमच्या घरात अडगळ”.

मालतीबाईंनी मुळींकावरची त्रासिक नजर हटवली आणि लगेच आपला मोर्चा वामनरावांकडे वळवला. वामनराव हॉलमधल्या पसा-यतुन वाट शोधत त्यांच्या दिवाणपर्यंत पोहचले. दिवाणावर बसणार तेवढ्यात मालतीबाई त्यांच्यावर खेकसून बोलायला लागल्या.
“आहो….! बसताय काय?”

वामनराव बसणार तेवढ्यातच दचकून उडावे तसे ताठ उभे राहीले. त्यांना बघुन मुळीक हसायला लागले. मालतीबाईनी त्यांच्याकडे पहात कुचकट स्वरात म्हणाल्या.

“तुम्हाला काय झालं हसायला, अहो…. हा पसारा तसाच राहुद्यात. पहिले खाली जाऊन १ लिटर दुध घेऊन या. आणि म्हशीचच दुध आणा मागच्या वेळेसारखे गाईचं दुध घेऊन याल”

मुळीक दोघांच्या मधे उभे राहून हा संवाद ऐकत होते.

वामनराव,”अगं! मागच्या वेळेस तु काय म्हणाली १ लिटर दुधाची पिशवी आणा मी तीच आणली. मला एक कळत नाही तुला कस काय कळत पिशवीतील दुध गाईच आहे की म्हशीचं”

मालतीबाई,”अहो….! नोकरी करायचा ना वो तुम्ही? वाचता येत ना तुम्हाला? लिहितात कि पिशवी वर गाय का म्हैस ते”

वामनराव, “नुसतं लिहीण्याने ठरतं का पिशवीतील दुध कोणाचे ते ?”

मालतीबाई,” तुम्ही उगीचच हुशारी दाखवू नका, देवाने तोंड दिलंय त्या तोंडाने म्हशीचे दुध दुकानात विचारा आणि घेऊन या. तो पर्यंत जेवण लावते मी”

मालतीबाई स्वयंपाक घरात जायला निघाल्या, तेवढ्यात मुळीक्,”चला वामनराव, मला पण दुकानात जायचयं. एकत्र जाऊ”

मालतीबाई,”अहो….! मुळींकांना सांगा, घोडा ज्याचा आहे त्याच्या दारात बांधून या. आपल्या घरात नको”

वामनराव,’हो हो! सांगतो मी. घराची किल्ली दे मला. ओढून घेतो मी दरवाजा”

मालतीबाई रागा-रागाने बाहेर येतात, वामनरावांच्या पुढे उभ्या राहतात. त्यांचा एक हात पकडतात आणि एका हिसक्यात त्यांना बाजूला करतात. वामनराव ज्या दिवाणासमोर उभे असतात त्यावरच घराची किल्ली पडलेली असते. ती उचलून वामनरावांच्या हातात जोराची टाळी मारावी तशी किल्ली ठेवतात.

मालतीबाई,”कधी सुधरणार हा माणुस देवाला माहीत. निष्काळजीपणाचा कळस आहे नुसता”

मालतीबाई परत स्वयंपाकघरात जायला निघतात. वामनराव हसत हसत म्हणतात,

“मी कशाला सुधारायला पाहीजे. तु आहेस ना!”

मालतीबाई आतूनच ओरडून म्हणतात,”हो हो… जा आता लवकर”

मुळीक घोडा घेतात आणि वामनराव चौरंग. दोघे घराच्या बाहेर पडतात. वामनराव दरवाजा जोरात ओढून घेतात तसा दरवाजा लॅच लॉकने बंद होतो. ज्या-त्या वस्तु योग्य ठिकाणी पोहचल्यावर दोघे “श्री सोसायटी”च्या गेटपर्यंत येतात. प्रमुख रस्त्यांच्या फुटपाथवर दोघे माना खाली घालून चालायला सुरुवात करतात. मनात काही तरी विचार करत मुळीक चालत होते. त्यांच्या मनात काहीतरी चालु आहे हे लगेच वामनरावांनी हेरले आणि म्हणाले,

“काय हो ? कसला विचार करताय”

मुळीक्,”काही नाही. तुम्हालाच काही तरी विचारायच होतं. पण विचारु की नको हा प्रश्न पडलाय”

वामनराव,”विचार काय करताय. बोलून टाका काय मनात आहे ते.”

मुळीक, “वामनराव आपण २० वर्ष झाले एकाच सोसायटी मधे राहतोय. तुम्ही तसे वयाने श्रेष्ठ पण आपली मैत्री टिकून आहे. तुमचा संसार जवळून पाहिलाय मी. तुमच्या मुलीचं शिक्षण, लग्न, घरातले आजारपण, सगळं-सगळं.
३० वर्षापेक्षा जास्त तुम्ही महानगरपालिकेत नोकरी केली. तुमच्या वागण्यात आणि स्वभावात कधीच बदल झालेला दिसला नाही. सोसायटीतली प्रत्येक व्यक्ती, अगदी लहान मुले सुद्धा तुम्हाला एक सरळ, साधा आणि सज्जन माणूस म्हणूनच पाहत आहे. पण एक शेजारी म्हणून मला नेहमी एका गोष्टीच वाईट वाटतं. वहिनी जरा तुमच्या बाबतीत जास्तच कडक आहेत. सगळ्या सोसायटीमध्ये सुद्धा तसाच गवगवा आहे. राग मानून नका घेऊ पण त्या आहेत शीघ्रकोपी; सारख्या भांडत असतात. रोजचा जो भाजीवाला आपल्या सोसायटीमध्ये येतो त्याच्याशी त्या कमीत-कमी अर्धा तास रोज भांडतात त्यांची खरेदी झाल्यावरच सोसायटीच्या बाकीच्या बायका भाजी घेतात त्याच्याकडून.”

वामनराव,”हा हा हा..! भाजीवाल्याचा गोंधळ माहीती आहे मला.. ते तर रोजच आहे”

मुळीक,” तुम्ही तर राव हसण्यावारी घेताय, फक्त भाजीवालाच काय, सगळ्यांशी भांडत असतात त्या. आपण संध्याकाळचे खाली बाकावर बसलेलो असतो तिथेसुद्धा ‘अहोऽऽऽ !’ असा आवाज आला की आम्ही सगळे समजतो की तुम्हाला बोलावणं आलं. त्यांचा आवाज आला की आम्हीच सगळे तुम्हाला जबरदस्तीने[ घरी पाठवतो. तुम्ही पटकन घरी नाही गेलात तर तुमचा आमच्यासमोरच पाणउतारा होईल याची आम्हालाच भीती वाटत असते.”
वामनराव,”कसं आहे मुळीक, आमच्या हिचं काम सगळ वेळेवर असतं. मी खाली बसलो की मला कधीच किती वाजले हे लक्षात येत नाही, जेवणाची वेळ चुकायला नको म्हणुन ती आवाज देत असते”

मुळीक,”हो पण प्रत्येक पाच मिनीटाला अहो-अहो करायची गरज आहे का? तुम्हाला सांगतो सोसायटीतल्या मुलांनी सुद्धा तुम्हाला “अहो” अस नाव ठेवलय. वाईट वाटतं हो. कसे काय सहन करता तुम्ही सगळं. एक तर तुम्ही अतिशय भोळे आहात. आम्हाला तर असं वाटत वहिनींच्या कायम अवहेलना करण्यामुळे तुमचा असा स्वभाव झालाय”

वामनराव,”बघितला आमच्या हिचा प्रभाव, मला ‘अहो’ नाव ठेवलय लोकांनी. आवडेल मला त्यांनी अहो नावाने बोलावलं तर. मला खरंतर खुप बर वाटलं आज. तुम्ही लोक खुप लक्ष ठेवता माझ्यावर.”

मुळीक,”राग आला का तुम्हाला ? पण आयुष्यभर तुम्ही नोकरी केली. आता रिटायरमेंट नंतर तरी तुम्हाला मोकळीक दिली पाहीजे तुमच्या बायकोने. समाजात बायकोचा एवढा अहमपणा चांगला दिसत नाही वामनराव. लोक काही बोलतात मग”

वामनराव,”बायकोच्या ताटाखालचे मांजर, येडा, भेकड, बायकोचा गुलाम असं काही म्हणतील. मला नाही फरक पडत
काही. विषय काढला म्हणून सांगतो. तुम्ही ते भाजीवाल्याचं भांडणाचं प्रकरण सांगितलं पण त्या मागची वस्तुस्थिती
नक्की काय आहे ते तुम्हाला माहीत नाही बहुतेक. एक तर आम्हाला एकच मुलगी, एकच अपत्य असायला कारण
सुद्धा आमची परिस्थिती. नसतं जमलं तोटक्या पगारात अजून एक तोंड सांभाळणं. एकाच मुलीच सगळं व्यवस्थित केलं आणि मार्गी लावलं. माझी महानगरपालिकेतील नोकरी; लोकांना वाटत वरकमाईही भरपूर असेल पण ते माझ्या स्वभावात नाही आणि माझ्या कुटुंबानेही पगारापेक्षा जास्त मागणी केली नाही. जसं आहे तसं काटकसरीमधे जगलो. तुम्हाला वाटत माझी बायको भाजीवाल्याबरोबर भांडते त्याच्याहून पुढचं मी सांगेन ती सगळ्यांबरोबर भांडते. म्हणजे कापडाच्या दुकानदाराबरोबर्, दूधवाल्याशी, आमच्या वाण्याबरोबर, अगदी सगळ्यांशीच. ह्याच्या मागचं खरं कारण म्हणजे भाव करणे. कमीत कमी किमतीमध्ये तिला वस्तू हव्या असतात हा तिच्या काटकसरीपणाचा परिणाम आणि आमच्या संसाराची गरज आहे. सोसायटीतल्या बायका आमच्या हिने भाजी घेतली की मग भाजी घेतात; पण एक लक्षात घ्या मुळीक, तीने ज्या कमी भावात भाजी घेतली त्याच कमी भावात सगळ्या बायका भाजी घेतात. लोक फक्त तिच्या भांडणाच उदाहरण देतात पण तिच्यामुळे झालेल्या फायद्याचं कोणीच बोलत नाही. लोकांना फक्त तोंड दिसतं हो”

मुळीक,”माफ करा वामनराव. मला वाटत मी फारच खासगी बोललो. खरं आहे माझ्या लक्षात भाजीवाल्याची गोष्ट आली नाही. खरच मी खुपचं चुकीचं बोललो तुमच्याशी”

वामनराव,”चुकीच काय त्यात. मित्र तुम्ही आमचे. तुम्ही विषय काढला म्हणून मला माझ्या बायकोबद्दल कोणाशी बोलता तरी येतय”

मुळीक,”मला वाटल तुम्ही दुखावले गेलात. आम्हाला नेहमी वाटतं की वहिनी तुम्हाला नव-यासारखी वागणूक देत नाहीत”

वामनराव,”काही अर्थाने बरोबर आहे ते सुद्धा. समाजात बायकोने नव-याला नव-यासारखी वागणूक द्यायची म्हणजे तो म्हणेल तसं बायकोने वागायचं. आमच्या बाबतीत शक्यतो ती म्हणेल तसा मी वागतो. तुम्हीच म्हणाला आत्ता की मी फार भोळा आहे वगैरे. खरं सांगू थोडा भोळसरच आहे मी पण आणि विसरभोळा सुद्धा. १० वर्षापासून मधुमेहाचं दुखणं मागे लागलं. तिला डॉक्टरांनी सांगीतलं जेवण वगैरे ह्या गोष्टी वेळच्यावेळी केलं आणि काही पथ्य पाळली की शरीरातली साखर वाढत नाही अगदी ठणठणीत राहते तब्बेत. तेंव्हापासून घडीघडीला ‘अहो’चा पाढा चालू झाला हिचा. जेवणाचा टाईम झाला की लगेच कावरीबावरी होते. मी जिथे असेल तिथून मला बोलावून घेते आणि जेवायला सांगते. आपण बाकावर संध्याकाळचं बसतो तेंव्हा ती मला रोज आवाज देत असते. मी लगेच गेलो नाही की मग ती स्वतः खाली येऊन मला घेऊन जाते. पण लोकांना वाटत की माझी बायको मला अजिबात मोकळीक देत नाही. तुम्हाला सांगतो मुळीक आमच्या हिला दिवसातून कमीत कमी ४ वेळा चहा लागायचा. १० वर्ष होऊन गेले हिने माझ्यासाठी चहासुद्धा सोडून दिला. हात लावला नाही चहाच्या कपाला.”

मुळीक,”काय सांगता वामनराव? तुम्ही तर डोळेच उघडले माझे. माफ करा वामनराव काही चुकून बोललो असेल तर”.

वामनराव,”माफी काय मागता मुळीक; मी सुद्धा मान्य करतोच की माझी बायको शीघ्रकोपी आहे ते. लगेच भडकते पण तिच्या प्रत्येक बोलण्यामागे माझी किंवा संसाराची काळजी असते. खुप भीती वाटते हो तिला प्रत्येक गोष्टीची, खुप काळजी करते सगळ्यांची. तिचं सारखं ‘अहो-अहो’ करण्यामध्ये लोकांना तिचा संताप दिसतो पण खरंतर ती खुप जास्त काळजी करते माझी. म्हणून सारखं ‘अहो-अहो’. तुम्हाला हसायला येईल पण जेंव्हा आमच्या वसुधाला दिवस गेले होते तेंव्हा एवढी बावरून गेली होती ही. रात्र-रात्र बसून तिची काळजी घेत होती. अचानक रात्रीची उठून वसुधाला गोंजारत बसायची. जेंव्हा वसुधाला इस्पितळात डिलिव्हरीसाठी घेऊन गेलो तेंव्हा वसुधापेक्षा हिचं जास्त रडत होती. माझ्या नातवाची तर एवढी देखभाल केली की एखादी आई स्वतःच्या मुलाची काळजी घ्यायची नाही. अक्षरशः झोपत नसायची. मला तर वाटायचं वसुधा नाही पण माझी बायकोच परत बाळंतीण झालीये.”

मुळीक,”खरच गोड आहे तुमचा शंभू. वसुधा सुद्धा अगदी हुशार. वहिनींनी तिच्यासाठी केलेली पळा-पळ पण पाहीली आम्ही सगळ्यांनी.”

वामनराव,”जावई सुद्धा चांगला भेटलाय आम्हाला. बाळंतपणाचा सगळा खर्च आम्हाला दिला त्यांनी. वसुधाला कसलाही त्रास नाही. येत असते घरी वरचेवर. घरी आल्यावर दोघी मायलेकी माझ्या विसरभोळ्या स्वभावाची चेष्टा करत बसतात. खुष असतात. तसा आहे मी विसरभोळा. मी कामावर जाताना सारखा डबा विसरायचो. मग ही घेऊन यायची डबा ऑफीसमध्ये. डबा आला की मी तिला ऑफीसच्या समोरच्या दुकानात घेऊन जात असे. कुल्फी फार आवडते तिला. त्या दुकानातली कुल्फी सुद्धा फेमस होती. कुल्फी खाऊन झाली की मी कामावर आणि बाईसाहेब घरी. गंमत काय आहे; मीच मुद्दामहून विसरायचो डब्बा. त्या निमित्ताने का होईना तिला कुल्फी द्यायचा योग यायचा. तेवढच रोमँटिक फिल का काय म्हणतात ते. नाहीतर बाईसाहेब स्वतःसाठी खर्च अजिबात करत नाहीत.”

वामनराव, मुळीक बोलत-बोलत केंव्हाच दुधाच्या दुकानापर्यंत आले होते. पण तिथेच कोप-यावर बोलत उभे राहीले होते. समोरून फुटपाथवरून मालतीबाई अर्थात वामनरावांच्या म्हणजेच अहोंच्या पत्नी चालत येतांना दिसल्या.

मुळीक,”वामनराव, आपली बहुतेक या रोडवरचं धिंड निघणार बहुतेक”

वामनराव,”का हो? काय झालं अचानक”

मुळीक, “समोर बघा! वहिनी चालत येत आहेत.”

वामनराव,”उशीरच झाला हो आपल्याला. आता आहे रस्त्यावरच सुरुवात”

मालतीबाई रुक्मीणीसारख्या कंबरेवर हात ठेऊन उभ्या राहिल्या. चेह-यावर राग दिसतच होता.
वामनराव,”अगं तु कशाला आलीस? मी येतच होतो.”

मालतीबाई,”येतच होता? कुठाय दुध? घेतलं का ? “

वामनराव,”हे काय घेतच होतो”

मालतीबाई,” बरं बरं ! घ्या दुध”

वामनराव दुध घ्यायला दुकानामधे जातात. तोपर्यंत मुळीक मालतीबाईंशी गप्पा मारत उभे राहतात.
वामनराव दुध न घेताच दुकानातून बाहेर येतात.

वामनराव,”मुळीकसाहेब पैसे आहेत का हो तुमच्याकडे आत्ता ?”

मुळीक,”आहेत की? का हो काय झालं?”

मालतीबाई,”काही नाही झालं, ह्या माणसाचं फक्त वय वाढलंय. वयाबरोबर वेंधळेपणासुध्दा… घरातून पैसे न घेताच दुध आणायला निघालेत महाशय. हे घ्या पैसे. तेवढ्यासाठीच आलेय मी”

वामनराव आणि मुळीक एकमेकाकडे पाहतात आणि हसतात. वामनराव पैसे घेऊन जातात आणि दुध घेऊन येतात. ते सुद्धा म्हशीचं.

वामनराव,”चला, जाऊ घरी”

मालतीबाई,”मी वसुधाकडे जातेय. शंभुला आणि तिला घेऊन येतेय. तुमचं जेवण काढून ठेवलय ते खा लगेच. किल्ली आहे एक माझ्याकडे. येतेच मी. गेल्या गेल्या फ्रीजमधे दुध ठेऊन द्या आणि हो… झोपू नका. तुम्ही घातलेला पसारा मी आवरलाय सगळा. तरी काही राहीलं असेल तर आवरून ठेवा. जावईसुद्धा यायचेत संध्याकाळी.”

वामनराव,”बरं बरं… ये जाऊन तु. मी करतो सगळं व्यवस्थित. चला मुळीकसाहेब.. तुम्हीपण जा पुढे तुमच्या कामाला. मी जातो घरी. नाहीतर तुम्हाला माहीत आहे आमची जेवायची वेळ चुकायची”

मुळीक,”मी पण येतो तुमच्या बरोबर घराकडे. माझं काम करेल संध्याकाळी”

मालतीबाई निघून जातात आणि ही मित्रांची जोड पुन्हा ‘श्री सोसायटीची’ रस्ता पकडते.

मुळीक,”वामनराव, मानलं राव आपण तुमच्या विसरभोळ्या स्वभावाला आणि मालतीबाईंना”

वामनराव,”आला म्हणजे तुम्हालासुद्धा प्रत्यय. अहो हे तर काहीच नाही. मला मधुमेह आहे म्हणून बाईसाहेंबानी माझ्यासाठी बुट आणले. मला काही बुट घालायची सवय नाही. मी नेहमी विसरतो बुट घालायला आणि चप्पल घालून बाहेर पडतो. बाईसाहेबांच्या जेंव्हा लक्षात येईल; तेंव्हा त्या हातात बुट घेऊन मी जिथे असेल तेथे येतात.. मला बुट घालायला लावतात आणि ती चप्पल हातात घेऊन घरी जातात. मग मी कुठे का असेना, ऑफीस,बस स्टँड, पाहुण्यांच्या घरात. कुठेही हजर असायची बुट घेऊन. मग मीच सवय लावून घेतली बुटाची, फार त्रास व्हायचा तिला”

दोघे बोलत बोलत सोसायटी पर्यंत पोहचले. मुळीक आणि वामनराव आपापल्या घरी गेले.

वामनरावांनी दरवाजा लावून घेतला. जेवणाच्या ताटाकडे बघितलं. दमल्यासारखे झाले म्हणून थोडावेळ शांत होउन बसले. लगेच उठून सा-या घराची आवराआवर केली. झाडून घेतले सारं घर. सगळं घर साफ केलं. नातु येणार म्हणून काचेच्या वस्तु कपाटाच्यावर ठेऊन दिल्या. वामनरावांना कामामुळे चांगलाच दम लागला होता. हॉलमधल्या दिवाणवर अंग टाकून दिले. मुळीकांबरोबर बायकोबद्दल केलेल्या गप्पा आठवत छताकडे बघत पडून राहिले.

वामनराव पहिल्यांदाच आपल्या बायकोबद्दल एवढे बोलले होते. काय सांगू? किती सांगू ? अशी त्यांची अवस्था झाली होती. पलंगावर पडल्या-पडल्या वामनराव डोळ्यासमोर २०-२५ वर्षाच्या संसाराचा रीळ फिरवत होते. लोकांना वाटणारा एक हुकमी संसार प्रत्यक्षात किती वेगळा होता. त्यांना वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत होत ते म्हणजे, मालतीबाईंबद्दल लोकांचं असलेले चुकीच मत. मालतीबाइंच असं हेकेखोर वागणं, त्रागा करणं हे फक्त होतं ते प्रेमासाठी. आपल्या नव-याच्या काळजीपोटी मालतीबाईंनी स्वत:च्या अस्तित्वाला कधीच तिलांजली दिली होती. आपला असं त्रागा करून वागण म्हणजे लोकांच्या मनात आपल वाईट मत बनवणं हा विचार आणि ह्या गोष्टीची काळजी मालतीबाई कधीच करत नव्हत्या. आणि ह्याच सामाजिक, वैयक्तिक त्यागाचे अप्रूप आज वामनरावांना वाटत होते. मुळीकांनी वामनरावांच्या मनातली तार छेडली होती. त्यांच्या मनातील सप्तकाने चांगलाच सूर धरला होता. बायकोसमोर आपलं प्रेम व्यक्त करता येणार नाही एवढा भिडस्त स्वभाव वामनरावांचा आणि तेवढाच काटेकोर स्वभाव मालतीबाईंचा. तरुण वयात पहिलं प्रेम झाल्यावर जसे भाव प्रकट व्हावेत तसंच वामनरावांना झाले होते. आपल्या बायकोच्या अपार प्रेमाने आणि तीची सोसायटीमधे होत असलेल्या कुचंबणेमुळे वामनरांवांचे ऊर अतिप्रचंड भावनेने भरून आले. आलेला हुंदका गिळून वामनरावांनी डोळे मिटले आणि काही क्षणातच त्याच मिटलेल्या डोळ्यातून अश्रु वाहु लागले. वामनराव आपल्या बंद नजरेमध्ये काय पहात होते म्हणूनच ही उत्कटता डोळ्यांमधून बाहेर आली असावी? हे वामनरावांनाच माहीत असावं. वामनराव प्रेमळ आठवणींच स्वप्न पहात तसेच झोपी गेले.

वामनरावांना चांगलीच झोप लागली. दोन-तीन तास होऊन गेले तरी न जेवताच वामनराव झोपून गेले होते. त्यांना जाग येत होती ती एका आवाजामुळे. त्यांच्या कानावर “अहो” “अहो” असं अस्पष्ट आवाज येत होता. त्यांच्या खांद्याला गदागदा हलवून कोणीतरी उठवायचा प्रयत्न करत होते. वामनराव जागे झाले. तेंव्हा त्यांना आवाज येत होता,

“अहो बाबा. ओ बाबा, अहो उठा की. दुपारचे काय झोपलाय”

वामनराव ताडकन उठून बसतात आणि त्या आवाजाकडे पहातात. ती होती त्यांची मुलगी ‘वसुधा’

वामनराव,” अगं कसा काय डोळा लागला दुपारचा आज कळलच नाही”

वसुधा,”केंव्हाच उठवतेय मी. तरी बरं घराची एक किल्ली माझ्याकडे आहे ते, नाहीतर दरवाजाच तोडावा लागला असता”

वसुधा तिथेच ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतील पाणी पिते. वामनरावांची नजर इकडे-तिकडे भिरभिरत होती. काही तरी शोधत होते ते.

वामनराव,”वसु अगं शंभु नाही आला का वर अजुन. आणि ही कुठे गेलीये. हं! आज्जी आणि नातु खाली सोसायटीच्या बागेत खेळत बसले असतील. तुला सांगतो वसु, मालती अक्षरशः लहान मुलासारखी खेळत असते शंभु बरोबर. सगळी सोसायटी ह्या दोघांची गंमत बघत असते. ही पण अशी आहे ना तुला घेऊन येते म्हणाली आणि तीन तास झाले तरी तुम्ही आला नाहीत मला लागली झोप. आता किती गोंधळ होणार आहे ह्या झोपेवरुन. माझी जेवणाची वेळ चुकलेलीच आहे, त्यात गोळ्या खायची सुद्धा. तू पटकन जेवणाचं ताट नाहीसं कर बघु. तिला कळलच नाही पाहिजे मी जेवण केलं नाही म्हणून. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते ?”

वसुधा स्तब्ध होऊन वामनरावांकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अश्रुच तळं झालं होतं. तारा तुटावा तसा आसवाचा थेंब डोळ्यातुन खाली टपकला. बापाकडे बघत वसुधा आपले अश्रु आवरण्याचा प्रयत्न करत होती.

वामनरावांच्या लक्षात येतं, काहीतरी बिनसलंय. ते उभे राहतात आणि विचारतात,”काय झालं वसु?”

स्वत:च्या वडिलांच्या या प्रश्नाने वसु स्तब्ध झाली. खुप मोठं दु:खाचं वादळ तिच्या मनामधे तयार झाले होते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वसु कडे होते पण त्यासाठी शब्द बाहेर पडत नव्हते. शब्द बाहेर पडतीलच कसे, मनात वादळच असं तयार झालं होतं की त्यातून फक्त अश्रुच वाट करु शकत होते. अश्रुनी वाट मोकळी केली आणि तीच दु:ख तेवढ्याच प्रखरतेने अश्रुंवाटॆ वाहु लागलं. वसु रडत होती. वामनराव कावरेबावरे होऊन तिच्याकडे पहात होते. एखाद लहानगं बाळ जसे निर्विकार चेह-याने अश्या प्रसंगात सगळ्यांकडे ज्या नजरेने पाहत, त्याच भाबड्या नजरेने वामनराव आपल्या लेकीकडे पाहत होते. त्यांना कोणत्याच गोष्टीची कल्पना येत नव्हती. त्यांच्या या निरागस मुद्रेकडे बघुन वसु अजूनच त्रस्त झाली होती.

वामनराव तिला पुन्हा विचारु लागले “काय झालय वसु ? शंभू बरा आहे ना ? का केलीस भांडण नव-याबरोबर”, वामनराव

वसु मात्र अनुत्तरीतच होती. स्वतःचा तोल जाईल या भीतीने ती भिंतीला टेकून उभी राहिली.
वामनराव पलंगावर सावरून बसले. आपल्या लेकीचा असा भेदरलेला आणि रडवेला चेहरा पहाताना त्यांच्या मनात शंका आली.”अगं काय झालं ते तरी सांग. सगळेच प्रश्न तुझ्या आईनेच सोडवावेत असा हट्ट करु नकोस. मला सांग काय झालय ते. तुझ्या आईला अजिबात सांगु नकोस. खूप सोसते ग ती. आता जास्त टेंशन नको तीला “

वामनराव उठतात आणि आपल्या लेकीच्या समोर जाऊन ऊभे राहतात. लेकीच्या डोक्यावरून मायने हात फिरवतात आणि तीला जवळ घेऊन तीच रडणं थांबवायचा प्रयत्न करतात. वामनराव लेकीची अशी अवस्था बघून गलबलून जातात तीला धीर देत म्हणतात,”असं रडत का कोणी? हं? वेडाबाई. आम्ही आहोत ना अजुन. सांग बरे काय झालय ते.. तुझी आई आली ना घरामधे आण तुझी अशी अवस्था बघून सगळ घर डोक्यावर घेईल आणि मग मला फैलावर घेईल..सांग काय झालं ते. मी बघतो तुझा सगळा प्रॉब्लेम” वामनराव लेकीला जवळ घेऊन बोलत असतात.
वसु मात्र अजूनही रडायची थांबली नव्हती. वामनराव थोड्या मोठ्या स्वरात बोलायला सुरुवात करतात.

“अगं बोल वसु, का तुझी आई आल्यावरच बोलणार आहेस ?”

विजेच्या वेगाने वसु पित्याच्या मिठीतून बाहेर येते. आपल्या भरलेल्या डोळ्याने पित्याकडे रागाने बघते. वामनरावांच्या दंडाला दोन्ही हाताने करकचून पकडते आणि वामनरावांना आपल्या पूर्ण ताकदीने ओढत स्वयंपाक घरात आणते आणि स्वयंपाकघरातल्या देव्हा-यासमोर वामनरावांना ऊभे करते. वामनराव देव्हा-याकडे पाहतात आणि देव्हा-याच्या वर असलेल्या मोठ्या फोटोकडे सुद्धा.

वसुचा श्वास मोठ्याने चालु होता. तिला दम लागला होता. त्याच आवेशाने वसु मोठ्याने बोलायला सुरुवात करते.
“अहो…… बाबा…. आई जाऊन तीन महीने झाले की हो . तुम्ही अजुन असे का वागता “

वसु आपले अश्रु आवरत वेगाने वामनरावांना त्या फोटो समोर सोडून घराच्या बाहेर वेगाने निघून जाते.

स्वयंपाक घरात भल्या मोठ्या मालतीबाईंच्या तसबिरीकडे वामनराव पहात होते. प्रचंड शांतता घरामधे पसरली होती. वामनराव स्तब्ध झाले होते. मालतीबाईचा फोटोकडे आणि त्यांच्या कपाळावरील ठसठशीत कुंकवाकडे वामनराव पहात होते. ख-या अर्थाने एकटीनेच केलेला दोघांचा संसार मालतीबाई शेवटाच्या जवळ आल्यावर वामनरावांना सोडून गेल्या होत्या. दोघे तसे शरीराने वेगळे होते मात्र आत्म्याने मात्र एकच. मालतीबाई लोकांसाठी निघून गेल्या असतील पण वामनरावांसाठी नाही. वामनराव तीन महिने होऊन गेले तरी मालतीबाईंच्या सान्निध्यात, मालतीबाईंच्या संसारात रमत होते. मालतीबाईंचा म्रृत्यू ही वस्तुस्थिती वामनराव मान्य करत नव्हते. करतील तरी कसे. वामनराव आणि मालतीबाई हे एकच. मालतीबाईंना वामनरांवाच्यातुन काढले तर वामनराव उरतच नाहीत. वामनराव तसबिरीकडे पाहून हसू लागले आणि फोटो बरोबरच बोलू लागले.

“काय गं? हा फोटो तु वसुच्या लग्नात काढला होता नाही. छान नटली होती तु. आपणच सगळं काम करत होतो लग्नामध्ये. आपण म्हणजे तुच फक्त मी म्हणजे तुझ्या भाषेत ‘काम वाढवून ठेवायचं काम’. हा हा हा. किती लक्ष ठेवायचीस माझ्यावर तू लग्नामध्ये सुद्धा. अजिबात थकली नव्हतीस. लग्नाचा पसारा उरकल्यावर मीच तुझ्या हौसेखातर हा फोटो त्या फोटोग्राफरला काढायला लावला होता. अजिबात थकवा दिसत नाही तुझ्या चेह-यावर”

वामनराव ओट्यावरच वसुने काढून ठेवलेलं जेवणाचं ताट उचलतात आणि तिथेच स्टुल घेवून टेबलावर जेवायला सुरुवात करतात. पुन्हा फोटोकडे बघुन वामनराव बोलतात.

“मला माहीत आहे. तुला काय वाटलं..? तु घरात नसलीस म्हणजे मी जेवणाची, औषधाची वेळ चुकवेन? छे! छे! शक्यच नाही. तुच बघ सगळं कसं तुझ्या वेळापत्रकाप्रमाणे चाललय. सवयच लागली आहे गं मालती मला. “
“तुला सांगतो मालती काल शंभु मला तुझी भीती दाखवत होता. म्हणे मला खेळायला घेऊन चला नाहीतर मी आज्जीला तुमच नाव सांगेन. मी मनातली मनात हसत होतो. “

वामनराव नुसतेच जेवणाच्या ताटावर बसले होते. संध्याकाळ झाली होती. स्वयंपाकघरात अंधार झाला होता. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण तसंच समोर राहीलं होतं, चालु होता तो फक्त वामनरावांचा मालतीबाईंशी संवाद. बहुतेक मालतीबाई सुद्धा त्यांना “अहो….!” असा प्रतिसाद देत असतील.

(समाप्त)

____मनस्वी राजन

प्रेम व्यक्त झालच पाहीजे..

Rose for allआज सकाळी सोसायटीतल्या मन्या केसांना जेल लाऊण,गाडी चका-चक धुऊन,बुट-कट आणि फ़ंकी शर्ट घालून गाडीवर बसला ते कॉलेजला जायला. जात असताना त्याचि आई म्हणालीच “आज सुद्धा कॉलेजला चालला आहेस तर एखादी वही सुद्धा घेऊन जा”. तेवढ्यात पलीकडच्या विंग मधली “मिस.सोसायटी” पांढरा फ़ट्ट् ड्रेस आणि हाय हिल पायात घालून टक-टक आवाज करत ऊतरली.. आज ऑफिसला ति रिक्षाने चालली होति. तिच्या पाठोपाठ खुप सारे होणारे आणि असणारे प्रेमवीर आपआपल्या परीने सजुन-सावरून ईछीत आणि निच्छीत कर्म स्थळी निघाले होते.१२वीच्या Maths च्या क्लासला जाणा-या अथर्वच्या खिशात सुद्धा कसल्या-कसल्या रंगाचे गंडे-दोरे आणि छोटे-छोटे भेटकार्ड होती. कारण आजची तारीख होती ति १४ फेब्रुवारी. म्हणजेच ’व्हॅलेंटाईन डे’. हा प्रेम करणा-या आणि प्रेम व्यक्त करणा-यांचा सण किंवा दिवस असतो. ह्याला भारतीय शास्त्रांनुसार पंचांग,तिथीच्या आकडेवारी मधे काडीचे सुद्धा स्थान नाही.

हा ’डे’ ब-याच वर्षांपूर्वी गो-यांच्या देशातून मुंबई सारख्या महानगरात आणि तिथून मग आता भारताच्या काना-कोप-यात पोहोचला. या दिवशी भारतीय परंपरेनुसार प्रेम व्यक्त करायचे असेल तर लाल गुलाब द्यायचा असतो, आणि मैत्रि करायचि असेल तर पिवळा गुलाब देणे. असे जबरदस्तीचे संकेत रुढ झाले आहेत. हा ’डे’ दिवसभर महाविद्यालयांमध्ये चालतो. जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला पिवळा गुलाब दीलातर समजायचं ८०% ह्या मुलाची बढती होणार आणि हाच मुलगा पुढच्या वेळेस लाल गुलाब देणार. काही-काही महाभाग तर सरळ-सरळ मुलींसमोर लाल आणि पिवळा गुलाब ठेऊन पर्यायच देतात.”बघ बाई मित्र म्हणून स्वीकारतेस की प्रियकर म्हणून ?”पण आता संस्क्रृती रक्षणाच्या नावाखाली ’डे’च्या प्रकारात बदल होयला लागले आहेत.गुलाब देणे-घेणे हे आता संस्क्रृती रक्षकांच्या डोळ्यात येण्याची दाट शक्यता असल्याने हा पर्याय टाळला जातो. सगळी देवाण-घेवाण वेगळ्या प्रकारात पण थोडीशी घाबरत-घाबरत चालते.

आता खरतर या दिवसाला विचित्र स्वरुप प्राप्त झालं आहे. कॉलेज युवक-युवती यांना ह्या चांगल्या दिवसांचा खरा अर्थच कळाला नाही. आपण जेंव्हा पाश्चिमात्य देशांचा सण आपल्या देशात साजरा करतो तेंव्हा त्या सणाचे स्वरुप सुद्धा आपल्या देशाच्या संस्कृतीप्रमाणेच बदलायला पाहीजे. आपण आपल्या प्रिय व्यक्ती समोर जाऊन प्रेम व्यक्त कराव याचा अर्थ असा नाही की फ़क्त मुलाने मुलीला propose करणे किंवा आपले प्रेम त्या दिवशी सेलिब्रेट करणे. खरतर , तुम्हाला वाटतय त्या सगळ्यांना भेटा.असा प्रेम व्यक्त करण्याचा सण पाहिजेच. सकाळी ऊठुन आई-वडीलांना ‘I Love You’ म्हणता आले पाहीजे. आपल्या भावंडाना सुद्धा माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे असं सांगता आले पाहीजे.मित्र-मैत्रीणींवरच प्रेम त्यांना सांगता आले पाहीजे. फ़क्त कल्पना करा तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला “तुमच्यावर माझ खुप प्रेम आहे” असे सांगाल तेंव्हा प्रत्येकाच्या मनात कीती बदल होतील.एकमेकाकडे बघण्यात आणि विचार करण्यात कीती आपुलकी वाटेल. मित्रांसमोर मन किती मोकळ करता येईल. आपल्या मनात ज्यांच्या बददल आदर आहे त्यांना सुद्धा हा approch कीती आवडेल. पण ’व्हॅलेंटाईन डे’ हा फ़क्त मार्ग म्हणून सगळे महाविद्यालयीन युवक-युवती साजरा करत आहेत.

प्रेम फ़क्त जे महाविद्यालयात असतं तेच नाही. कधीही न मोजता येणारे प्रेमाचे स्वरुप आहे. प्रत्येक प्रेम हे व्यक्त होयलाच पाहिजे.. ते प्रेम कळलच पाहीजे.. आई,वडील,भाऊ,बहीण,मित्र,नातेवाईक,ज्येष्ठ,श्रेष्ठ ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे ते त्यांना तरी कधी कळणार.. खरच प्रेम हे व्यक्त झालच पाहीजे.. Love you all..

मनस्वी राजन…

ती, तिचं बाळ आणि मी.

पुण्यामधे माझी एक पक्की जागा आहे.
माझा एक कट्टा म्हटलं तरी चालेल.
माझ्या मित्र-मैत्रिणींचा जमायचा अड्डाच आहे तो.
’डेक्कन’ वरुन कोणी जाणार असेल तर जाता-जाता ’तुलसी’कडे बघुन जातोच.
आमच्यापैकी कोणीतरी तिथे भेटायची शक्यता जास्त असते.
’तुलसी’ म्हणजे डेक्कन वरच फेमस चहाच होटेल. इथल्या ’चहा’ पासुन ते तुलसीच्या मालकापर्यंत प्रत्येक गोष्टच वेगळी.
म्हणजे सगळच वेगळं,’तुलसीच्या चहाची चव’,’तुलसीचा मालक, तुलसीचे कामगार आणि तिथे बसणा-यापर्यंत सगळच वेगळ.
माझा एक मित्र नेहमी म्हणतो,”तुलसीचा चहा गरम असतो तो पर्यंत मसालेदार, पण जर का तो थंड झाला तर त्याच चहाची ’रम’ बनते. असो…

रस्ते खंदणा-या कामगारांपासुन ते रोज CCD,Barista मधे बसणारा Crowd इथे बसलेला दिसतो.
हो! पण एवढ्या गि-हाईंकांमधे आता आम्हाला थोडी वेगळी treatment मिळते.
3 रुपयाच्या चहा घेऊन दोन-दोन तास बसणा-या काही ठराविक लोकांमधे आमचा समावेश झाला आहे. पलीकडचा टपरीवाला सुध्दा प्रत्येकाच्या सिगरेटचा ब्रँड अगदी ओळखतो.

ह्या तुलसीवर मी Sat-Sun असतोच असतो.
तुलसीच्या समोरच्या फुटपाथवर एक जोडपं काही वस्तु विकत असतं.
’तो’ म्हणजे तिचा नवरा, रोडवर बसुन मोबाईलचे कव्हर विकत असतो.
आणि ’ती’ त्याच्या शेजारी बसुन पोस्टर, वाँल पेपर विकत असते.
त्या पोस्टर्सवर ’Never, Never Give Up’,'In My Room’ या सारखे Bachelor मुला-मुलींसाठी जबरदस्तीच्या philosophical गोष्टी लिहिलेल्या असतात.
लोकांच्या घरांमधे कसं वागायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, त्यांची तत्व, शिष्टाचार हे सगळ ’ती’ बाई रस्त्यावर बसुन विकते हा सुध्दा मोठा विरोधाभास आहे.
त्या दिवशी दुपारी 11 च्या सुमारास मी माझ्या ग्रुप बरोबर बसलो होतो.
ग्रुपच्या भाषेमधे “फुल्ल संडेगिरी” चालु होती.
ते जोडपं सुध्दा आपले दुकान थाटुन बसलं होतं.
त्यांच्या दुकानाच्या मागे तुलसीच्या शेजारच्या दुकानाचा मोठा कट्टा आहे.
त्याच कट्ट्यावर एक अंदाजे महीन्याचं लहान बाळ झोपलं होतं.
त्याच्यावर एका मोठ्या होर्डिंगची सावली होती.
त्या लहान बाळाला एक मोठी बहीण होती. दोन-तीन वर्षाची असेल ती. ती सुध्दा तिथेच फुटपाथ वर खेळत होती.
का? कुणास ठाऊक? माझं त्या झोपलेल्या बाळावर सारखं लक्ष जायचं.
त्याला असं एकटं झोपलेलं पाहुन माझ्या मन कुठेतरी अस्वस्थ होत होते.
हळू-हळू त्या बोर्डाची सावली सरकत होती आणि बाळाचा पाय उन्हामधे आला होता.
त्यामुळे बाळाची झोप सुध्दा उडत होती.
मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं,”जर का त्या बाळाच्या आईने 15 मिनिटामधे बाळाकडे नाही बघितलं, तर मी तिच्यावर ओरडणार”.

हळु-हळु ते बाळ पूर्ण उन्हामधे आलं.
त्याला त्या उन्हामधे डोळे सुध्दा उघडता येत नव्हते.
बाळ झोपल्या जागेवरच रडायला लागल.
हाता-पायाची जोर-जोरात हालचाल करायला लागल होत.
आई पासुन बाळाच 15 फुटांच अंतर होतं. पण डेक्कनच्या रहदारीमुळे तीला त्याच्या रडण्याचा आवाजही जात नव्हता.

मी अचानक जोरात ओरडलो आणि तिला आवाज दिला.
तरी सुध्दा तीच काहीच लक्ष नव्हतं.
माझ्या ग्रुप मधले मला म्हणाले,”कशाला ओरडतोस, सगळे लोक तुझ्याकडे बघतायत.”
मग मीच शांत झालो.
बाळ त्याच उन्हात शांत झोपायच प्रयत्न करत होत.
पण उन्हामुळे त्याची जोराची तडफड चालुच होती.

मला वाटले आपण स्वत: जाऊन त्याला सावलीत ठेवावं.
पण माझ ’ती’च्यावर जबरदस्त डोकं फिरल होत.
मग मी अचानक ग्रुप मधुन उठलॊ आणि ’ती’च्याकडे गेलो. तीला जबरदस्त सुनवल.

माझ्या अशा ओरडण्याने दोघे नवरा-बायको उभे राहिले..
’ती’ लगेच पळत-पळत बाळाकडे गेली.
आणि त्याला स्वत:च्या मांडीवर घेऊन पदराआड घेतलं आणि त्याची भूक भागवली आणि त्याच रडणं सुध्दा थांबवण्याचा प्रयत्न केला.
’ती’ त्यावेळेस बाळाला पदराआड घेऊन माझ्याकडे पहात होती..
’ती’च्या नजरेतुन तिची मजबुरी आणि होत असणारे दुर्लक्ष ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला तिचीच किव येऊ लागली.
अंगावरची ’ती’ची साडी आणि साडीसारखीच ’ती’ची झालेली फाटकी अवस्था मला जास्तच विचलीत करत होती.

नंतर पुन्हा मी ग्रुपमधे जाऊन बसलो.
’तुलसी’वरुन निघताना मुद्दामच मी त्या बाळाकडे गेलो.
ते शांत झोपले होते.
पण त्याची झोपसुध्दा माझ्या मनामधे फारच हाल-चाल करुन गेली.
’ती’ माझ्याकडे तेंव्हा बघत होती.
माझ ’ती’च्या कडे लक्ष गेलं.
काय झाल माहित नाही; पण ती थोडी घाबरली.
आणि मोठ्या मुलीला कुशीत घेऊन स्वत:समोर पसरवलेल्या दुकानावर फडकं मारायला लागली.

मी तिथून निघालो.
पण त्या बाळाची आणि ’ती’ची त्या बाळाला पदराआड घेतल्यावर माझ्याकडे टाकलेली त्या लहनग्यापेक्षा केविलवाणी नजर माझं मन आणि डोकं सुन्न करत होती.
काही केले तरीही ती घटना माझ्या मनातून आणि डोक्यातून बाहेर जायला तयारच नव्हती..

परत पुढच्या वीक-एंडला ’तुलसी’वरची माझी मैफल संध्याकाळी जमली होती.
नेहमीप्रमाणे 3 रुपयाच्या चहात बराच वेळ ’संडेगिरी’ चालु होती.
यावेळेस ते जोडपं दिसत होत. पण त्यांची दोन्ही मुले दिसत नव्हती.
शेवटी आम्ही निघालो.
तुलसीवरुन जात असताना कोप-यावर ’ती’ची मोठी मुलगी बाळाला मांडीवर घेऊन होती.
या मुलीच्या हातात बर्फाचा लालबुंद गोळा होता.
तो गोळा ती लहानगी खात होती.
आणि खात असताना जाणुन-बुजुन त्या बाळाच्या ओठांवर, तोंडावर त्या गोळ्याचे थेंब पाडत होती.
बाळ त्या थंड थेंबामुळे स्वत:ची मान अगदी सरसर इकडुन तिकडे फीरवत होत.

हे माझ्या लक्षात आल्यावर..
मी त्या लहान मुलीवर रागाने खेकसलो..
तेवढ्यात ’ती’ पळत आली..
मुलीच्या मांडीवरुन बाळाला पटकन ऊचललं..
त्याच फाटक्या पदराने त्याच ओल झालेल तोंड पुसलं..
’ती’ने मला ऒळखलं होतं..
तेंव्हासुध्दा ’ती’ घाबरलेली होती..
मी तिच्याकडे फक्त बघितले..
आणि ’ती’ लगेच बाळाला घेऊन निघुन गेली..

’ती’चा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला,
“साहेब..! पोरांसाठी हा धंदा लावलाय.. आम्ही दोघं इथ काम करतोय..
पण अस होतय की ज्याच्यासाठी कमवायच त्यांच्याकडॆ बघता येत नाय..
त्यांच्याकडे बघत बसल तर कमवता येत नाय.. मग खायला काय घालनार.
तुम्हीच सांगा काय करता येईल ते..”

मला त्याला काहीच उत्तर देता आला नाही..
तो खुपच अवघड बोलुन गेला होता..
ज्यांची भुक भागवायची त्यांची काळजी घेता येत नाही..
आणि त्यांची काळजी घेत बसल तर मग त्यांची भुक भागवता येत नाही..
एकंदरित ही परिस्थीतीच माझ्या कल्पनेच्या पलीकडची होती..

मी त्याच्या समोरुन निघुन आलो.
त्याचा प्रश्न मात्र मलाच कोड्यात टाकुन गेला..

पुढे चालता-चालता ’ती’च्या कडे बघीतलं..
बाळाला काहीतरी झालं होतं..
जोरजोरात बाळ रडत होतं..
’ती’ त्याला मांडीवर घेऊन शांत करायचा प्रयत्न करत होती..
मी तिथे जाऊन ऊभा राहीलो..
’ती’ बाळाला शांत करत असताना त्याच्याकडे एकटक पहात होती..
’ती’ची अवस्था सुध्दा बाळा सारखीच झाली होती..
’ती’त्याच्या रडण्यासमोर अक्षरश: हरली होती..
जोरजोरात मांडी हलवत बाळाला शांत करायचा असफल प्रयत्न करत होती..
एकंदरीत ’ती’च्या कडे बघुन अस वाटत होतं ती सुध्दा बाळाकडे एकटक पाहत असताना जोरात रडायला सुरुवात करेल..
आणि ’ती’ सुध्दा रडायचा प्रयत्न करत होती..
पण ’ती’ला रडता सुध्दा येत नव्हत..
डोळेतर ’ती’चे पानवलेले होते..
पूर्णपणे हरल्यासारखे ’ती’ त्या बाळाकडे बघत होती..
बाळ आता खुप मोठ-मोठ्याणे रडायला लागल होतं..
त्याला अचानक काय झाल होत ते काहीच कळत नव्हतं..

बाळाच्या त्या मोठ्या आवाजात रडण्याने काहीतरी वेगळच घडलय अस वाटायला लागल होत..
’ती’तशीच एकटक त्याच्याकडे पहात होती..
त्याला धोपटत त्याला शांत करत होती..
पण बाळ काही शांत होत नव्हत..
’ती’च्या चेह-यावर नक्की काय रंग होता; तोच कळत नव्हता..
अस वाटायच की ’ती’ रडेल, नाहीतर बाळावर राग काढेल, काहीतरी मोठ्याने बोलेल..
पण काहीच नाही.. फक्त शांत होती ’ती’..

’ती’चा नवरा तीथे आला..
’तो’ बाळाकडे पहात होता..
’ती’ने त्याच्याकडे पाहीले..
अचानक बाळाला जोरात स्वत:च्या अंगावर गच्च आवळुण धरले..
आणि अक्षरश: मोठ्याने तिने सुध्दा त्या बाळाबरोबर हंबरडा फोडला..
’ती’ जोरजोरात रडायला लागली..
नंतर ’ती’ रडत होती.. पण ’ती’च्या रडण्याचा आवाज सुध्दा फुटत नव्हता..
’ती’ खुप वेळ बहुतेक याच वेळेची वाट बघत होती..
’ती’ची मोठी मुलगी ते पाहुन पळतच आली..
तिला सुध्दा ’ती’ने जोरात स्वत:च्या अंगावर ओढुन घेतल..
आणि पुन्हा जोरात रडायला लागली..

मला तिथे थांबणे योग्य वाटले नाही..
मी लगेच निघलो.. पुढे जाऊन थांबलो..
’ती’तिथेच दोन्ही मुलांना घेऊन बसली होती..
’ती’च बाळ तीच्या गच्च मीठीतच झोपुन गेल..
’ती’ची मुलगी ’ती’च्या पदराशी खेळत बसली..
’ती’ बराच वेळ आहे त्या स्थितीमधे बसली होती..
ब-याच वेळाने तिने बाळाला एका दुकानाच्या आडोश्याला झोपवल..
तिथेच ’ती’ची मुलगी सुध्दा बसली..
लगेच ’ती’ लगबगीने तिच्या दुकानाकडे गेली..
तिचा नवरा तिथेच दुकानावर होता..
आणि पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात केली..

मी सुध्दा तिथुन निघालो..
त्या बाळाचा आणि ’ती’च्या रडण्याचा आवाज कानामधे थैमान घालत होता..
अजुन सुध्दा मला ’ती’ आणि तिच्या बाळाचा आवाज ऐकु येतो..
मी काही करु शकलो नाही.. किंवा मी काही करुही शकत नाही..
अजुन सुध्दा या कुटुंबाने मला पाहील की ’ती’लगेच बाळाकडे पहात असते..
आणि मला त्या दिवसाची परत-परत आठवन करुन देते..

मागच्या महीण्यापासुन आता फक्त दोघेच दिसतात..
“मुले कुठे आहेत ?” असा प्रश्न विचारायची माझी हिम्मतच होत नाही..
ते जे काही करतात मुलांसाठी हेच खुप मोठं आणि अवघड आहे..
पण नक्कीच ’ती’च बाळ व्यवस्थित असेल..
’ती’च तीच्या बाळावरच प्रेम मला त्या दिवशीच बाळाला घेतलेल्या त्या गच्च मिठ्ठीत आणि त्या हंबरड्यामधे दिसलं होतं..
पण अजुनही तो प्रसंग मला कधी-कधी एकदम अस्वस्थ करतो..

(समाप्त)

____मनस्वी राजन,

(टीप : सत्य प्रसंग/अनुभव/घटनावर आधारीत.)

दंश

उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.
झोपेच्या अंधा-या कुशीमधे तर स्वप्नांना सुध्दा बंदी होती. निर्जीव यंत्राप्रमाणे दिवसभर हात-पाय चालत होते, रक्ताचा रंग बदलत होता आणि पाण्याप्रमाणे शरीरातून निघत होता. शरीरातील एकएक तंतु गुप्त होउन काही घटकांच्या मरणयात्रेवर गेला होता. जो जीवन जगतो त्याला स्वप्न, इथे तर धड जगणं सुध्दा नव्हते. आयुष्य नावाच्या एका भेसुर आणि दुर्दैवी जन्माच्या यात्रेचा गाडा ओढायाचं काम सगळेच करत होते. दिवस येतो तो फक्त कष्टासाठी आणि मावळतो तो फक्त मरण्यासाठी. त्या अस्वस्थेतच एक जीव किनकिनत होता. निद्रा नामक तात्पुरत्या मृत्यूशय्येवर सगळे जीव निर्जीव झाले होते. मात्र त्या जीवावर लक्ष होते ते फक्त अंधाराचं. तो चाचपडत उठला आणि जोराने टाहो केला, “आयेऽऽऽऽऽ… लै पोटात दुखतयं..”

त्या सपराच्या घरातून बराच वेळ ओरडण्याचा आवाज येत होता. तो आवाज सुध्दा त्या दिर्घ रात्रीच्या अंधाराने गिळून टाकला. असं झालं तरी काय. कुणाला काहीच माहीत नव्हतं. अंधाराचा गडदपणा हळूहळू कमी होत गेला, तसं चित्र स्प्ष्ट दिसू लागलं. सपरांच्या घराची मोठी चाळच होती. रानात काम करणा-या गड्यांच्या संसाराची वस्ती.

ज्वारीच्या वाळक्या कडब्याच्या आणि ऊसाच्या पाचोळ्याचे झाप बनवून भिंती तयार केलेल्या. अश्या झोपड्यांची मोठी चाळच इंदलकरानी बांधली होती. “खोपाट ” म्हणायचे सगळे ह्या झोपडी सारख्या घराला. इंदलकराच्या मळ्यात हे सगळे सालाने काम करणारे आणि त्यांच्या बायका त्याच मळ्यात रोजंदारी करणा-या. सा-या वस्तीला जाग आली होती पण परश्याच खोपाट ऊघडलं नव्हतं. गंजलेल्या पत्र्याचा टेकु लावला होता. तो पत्रा म्हणजेच त्या खोपटाचा दरवाजा. बायका विहीरीवरुन हंड्याने पाणी भरत होत्या. कोणीतरी परश्याच्या दारात ठेचकळली तेंव्हा तिच्या नजरेत खोपटाच बंद दरवाजा आला. तिथेच लागलेल्या ठेसेचा राग त्या बंद घरावर काढला आणि बरोबरच्या बाईला म्हणाली, “यस्वा मेली. इंदलकराच्या मुकादमाबरोबर पाठ लावती आणि नवरा खातुया भाड.”
दण्-दण पाय आपटत त्या दोघी दारातून निघून गेल्या.

त्या वस्तीतल्या नानाच्या ही गोष्ट लक्षात आली. नाना वस्तीवरचा वयस्कर माणूस. एकटाच रहायचा. त्याने खोपटाच्या दारातून परश्याला आवाज द्यायला सुरवात केली,
” परश्या.. ओ राज.. तुम्ही तर लका आक्रितच करतया गड्या हो. समदी निघाली तरी तुमचा उठायचा पत्ता नाय. दोघं नवरा-बायकु काय खोपडी पिऊन झोपली का काय”. नानाने दारात वाट बघितली. तंबाखू काढली आणि तिथचं मळत उभा राहिला. आतून काहीच हालचाल नाय म्हणल्यावर चुण्याच्या डबीने दार वाजवायला सुरवात केली. आतमधुन कसलाच आवाज येत नव्हता. नाना थोडा तणतणला. दोन-चार गडी त्या खोपटाच्या दारात बोलावले. त्यातला एकजण बोलायला लागला,
“आरं काय वो हे? परश्या दारुसाठी मुकादमाची पाठ सोडत नाय अन त्याच्या बायकुची मुकादम पाठ सोडत नाय. आजुन ह्यांच्या आयला ऊठायचा तपास नाय. ऊस काढायचाय आज अन हा भाड्या झोपुन राह्यलाय”.
त्यांच्यातलाच उत्तम नावाचा सालदार,”आवं ती बाई मुकादमाला करल मुका आणि परश्याला करल मुकादम आपल्या ऊरावर बसवायला. ह्याच्या आयला काढा बाहीर त्याला. गडी यायचा उशीरा तवर आपुण उरकायच्या काय त्याच्या सरी”.

सगळेजण दार वाजवत होते. शेवटी खोपटाच्या दाराला जोराचा धक्का दिला. खोपटाचे दार उघडले. खोपटाच्या आतुन एखादी वीज वेगाने दारावर येऊन सर्वांच्या अंगावर धडकावी आणि त्याच वेगात सगळेजण हादरुन दरवाज्यापासून उलट्या पायाने आणि विजेच्या वेगाने मागे फिरले. एखादी कोणाला न ऐकु आलेली किंकाळी सगळ्यांचे कान सुन्न करुन गेली आणि सगळ्यांच्या नजरा सुध्दा बधीर झाल्या. परश्याच्या खोपटामधे एक बारीक हालचाल झाली; आणि मागे फिरलेले पाय पुन्हा खोपटाकडे त्या निर्जीव वातावरणात चालू लागले. जी बारीक हालचाल झाली ती अर्जुनाची. ’अर्जुन’ परश्याच्या एकमेव मुलगा. परश्या आणि त्याची बायको खोपटामधे हात-पाय वाकडे करुन पडले होते. बाभळीच्या लाकडासारखे कडक झालेले हातपाय आणि अस्ताव्यस्त झालेली त्यांच्या अंगावरची फाटकी वस्त्रे वस्तुस्थितीची जाणीव करुन देत होती. दोघांचाही जीव मरणयात्रेवर गेला होता. दोघांचाही मृत्यू झाला होता.

अर्जुन त्यांच्या बाजुलाच त्या ताडपत्रीवर पडला होता. एक पाय हवेत उचलायचा प्रयत्न करत होता. पोट दाबत होता. तोंडातून फेस वजा थुंकी बाहेर काढत होता. अर्जुनाला जिवंत पाहून सगळ्यांनी लगबग केली आणि खोपटात घुसले. वस्तीतल्या नानाने पटकन खाली बसून अर्जुनाचा पाय उचलून त्याचा तळवा चोळायला सुरवात केली. त्याच वेळी खोपटाच्या कोप-यातुन सळ-सळ असा दिर्घ आवाज झाला. त्या आवाजाकडे सगळ्यांच लक्ष वेधले गेले. नानाने अर्जुनाचा पाय हातून तसाच सोडून दिला आणि तो तसाच उभा राहिला. दोन काळेकुट्ट साप खोपटाच्या पाचोळ्यातून बाहेर जात होते. एक अंदाजे तीन्-चार फुटाचा असेल आणि एक त्याच जातीचा साधारण दिड फुटाचा होता. आवाजाची सळ-सळ ज्या वेगात आली त्याच वेगाने दोन्ही साप पाचोळ्यातून बाहेर गेले. ती सळ-सळ आणि सापांनी वेगात जाण्यासाठी सरपटताना केलेली वळ-वळ सगळ्यांच्याच अंगावर काटा आणून गेली. भितीने सगळ्यांचे घशे कोरडे पडले, घश्यातच आवंढे घेत सगळेजण उभे राहिले आणि पटकन अर्जुनाला उचलून खोपटाच्या बाहेर आणले.

पटकन कुणीतरी जाऊन तांब्यामधे पाणी आणले. अर्जुनाच्या तोंडात थेंब-थेंब पाणी सोडलं आणि नाना त्याला विचारु लागला.
“आर्जुना काय रं झालं ?”.
अर्जुन,” लैऽऽऽऽ पोटात दुखतया नानाऽऽ, पायबी लय दुखतोयाऽऽऽ. आग पडलीयाऽऽऽऽ पोटात..”
अर्जुना त्याला जमेल तेवढ्या मोठ्या आवाजत विव्हळण्याचा प्रयत्न करीत होता. अर्जुना कन्हत होता.
“आई बा ला काय झालयं रं तुझ्या “,नाना.
अर्जुन, “लै हातपाय झाडत होती दोघं, मग पार शांत झाले, मलाबी काय तरी चावलय पायाला. लै चुन-चुनतयाऽऽऽऽ. ओ नानाऽऽऽऽ बघाना वोऽऽऽ”.
नाना,”आरंऽऽऽऽ , भो**च्या होऽऽ. गर्दी करुन हुभ राह्यलया. आत खोपटात बघा की काय हालचाल हाय का?”

दोघे-तिघे घाईने खोपटात गेले, परश्याचे आणि त्याच्या बायकोचे हातपाय कसेबसे सरळ केले. तिथल्याच एका पोत्याचे सुत काढुन परश्याच्या नाका समोर धरलं;
तसंच सुत परश्याच्या बायकोच्या नाकासमोर धरलं; कसलीही हालचाल नाही म्हंटल्यावर दोन बायकांनी टाहो फोडला. सा-या बायका, बापे, लहान मुले, वस्तीवर बांधलेली गुरे, दारात फिरणा-या कोंबड्या आणि एकूणच सा-या मळ्याच्या नजरेने खोपटाचा वेध घेतला. सकाळचा मळ्यावरच्या वस्तीवर फिरणारा प्रसन्न वारा आज मात्र वातावरणाला चांगलाच झोंबला होता. मळ्यावरची वस्ती परश्याच्या खोपटापुढे जमा झाली. दोघांची प्रेते लोकांनी खोपटाच्या दारात ठेवली. वस्तीतल्या बायकांनी त्या दोघांचा ताबा घेतला आणि अक्षरश: मोठ्या आवाजात रडगाणं चालू केले. सगळ्या पुरषांनी तिथेच गराडा घातला आणि दोन पायावर बसले. कोणी तंबाखु काढली, कुणी बीड्या पेटवल्या, कुणी बळेच डोळे पुसायला सुरवात केली. तर कुणी आपल्याच पायाच्या अंगठ्यानी जमीन टोकरत परश्याच्या बायकोच्या गळ्यातल्या गंठणाचं काय करायच असा विचार करत खाली मान घालुन बसले. तिथूनच काही पावलं अंतरावर नाना अर्जुनाच पाय चोळत बसला होता. हा सगळा प्रकार बघुन नानाने ओरडायला सुरवात केली.

“आरं तुमच्या आयला होऽऽऽऽ, थोबाड घीऊन बसलायसा, डॉक काय वढ्याला गेलय व्हय ईरड करायला”
सगळेजण जागेवरुनच मान मागे करुन नानाकडे बघायला लागले. नानाचा पारा आता वाढला होता. अर्जुनाची नजर जड होत होती. तो अस्पष्ट आवाजात कण्हत होता.
नाना,” आरंऽऽऽऽ,इंदलकराला बोलवा, मुकादमाला सांगा, त्यांच्या ताब्यात मढी द्या आणि पहीलं अर्जुनाकडं बघा. पोरात जीव हाये. वाचवायला पायजे, उठा लौकर, हाला बिगीबिगी”
तसे दोन गडी उठले आणि इंदलकरांच्या वाड्यावर जायला निघाले. बायका परश्याच्या खोपटात गेल्या आणि आतमधुन दोन फाटके रग आणले. काही माणसांनी त्या फाटक्या रगानी परश्याचे आणि त्याच्या बायकोचे प्रेत झाकले . सगळेजण नानाकडे धावले. सगळ्यांनी नानाकडे बघून न बोलता एक प्रश्न एकसाथ विचारला होता.

तो म्हणजे, “आता काय करायचं? परश्याचं काय करायचं?”
नाना, “मला काय अर्जुनाचं खरं वाटाना गड्यांनो, पोराचा पाय काळा पडलाय. कीडुक चावलय पायाला. कायतरी करायला पायजे. अर्जुना वाचायला पायजे”.
भिका नावाचा सालदार हळुच नानाला म्हणाला, “नाना खरं तर बोलणं बरं नाय पण कुणीतरी बोलायलाच पाह्यजे. अर्जुन जरी वाचला तरी बी त्याला संभाळायचा कसा. आपल्याला रोज हाता-तोंडाची गाठ पाडायला रगात पडपर्यंत काम कराया लागतया. त्यात आजुन एक त्वांड घरात ठिवायचं म्हनजी पोटावर आणि कपाळावर बी पाय ठीवल्यासारखं झालय”.
त्याच बोलण तोडतच उत्तम सालदार बोलायला लागला, “व्हय नाना बराबर हाये भिकाच,आणि पोरगबी मोठ नाय. पाच-सात वर्षाच असल. मोठ आसतं तर ज्याच्या घरात राहील त्याच्याकडनं मळ्यात सालदार गड्याच आपल्यावाणी गुरासारख काम केल असत. ज्याच्या घरात हाये त्याला चार पैक तरी भ्यटल असत. पण तस बी नाय ना वो. म्या तर म्हणतो त्यो मुकादम यायच्या आत परश्याच्या बायकुच्या गळ्यातला गंठण काढुन घ्या. आता सगळ शेवटचं करायचयं धाव्या दिसापर्यंत. आपुन कुठुन आणायचा पैका. त्या मुकादमाचा असाबी परश्याच्या बायलीवर डोळा व्हता. त्यो भाड्या आल्या-आल्या तीच्या गळ्याला हात घालल गंठण काढायला”.

सगळ्यांनी एका स्वरात “व्हय व्हय” म्हणायला सुरवात केली. पटकन एक बाई उठली आणि परश्याच्या बायकोची मान उचलुन तिच्या गळ्यातील चार मन्यांचा गंठण काढुन घेतला, आपल्याच साडीच्या पदरात बांधुन ठेवला आणि आपल्या जागेवर जाउन बसली. नाना अर्जुनाच्या केसातुन हात फिरवायला लागला. अर्जुनाच डोळे मिटले होते. त्याच्या बंद ओठातुन त्याचा हुंकार ऎकु येत होता. त्या इवल्याश्या पोराच्या नाकावर आणि ओठावर माश्या बसत होत्या पण अर्जुनाकडे तेवढे त्राण नव्हते की त्या माश्या तो हटकुन लावेल. नाना अर्जुनाचा तोंडावरुन हात फिरवताना माश्या हटकु लागला. त्याच्या निळ्या रंगाच्या सद-याची बटण तुटली होती, त्याच शर्टाने त्याच्या तोंडातुन येणारी लाळ नाना पुसत होता. अर्धमेला जीव नानाच्या मांडीवर डोके ठेऊन आपल्या जगण्याची लढाई लढत होता. कायमच दारिद्र्या नशीबी असल्याने अर्जुनाच्या अंगात चड्डीचा पत्ता नव्हताच. कोणाचा तरी मागुन आणलेला अंगापेक्षा मोठा सदरा त्याच शरीर झाकायच काम करत होता.

अर्धमेल्या अर्जुनाकडे बघत नाना चेतुन ऊठला,” आरं द्वाडा होऽऽऽऽ, माणसाच्या जीवापरीस पैश्याचं मोठपण आलय तुम्हाला. म्या संभाळतु अर्जुनाला. तस बी म्या एकलाच भिकार, आसु द्या माझ्या जोडीला”.
भिका, “आरं नाना, जमनार हाये का तुझ्यानी? तुझच वय झालया आता”.
नाना,”मग काय जीव घ्यायचा का पोराचा. आर माणस हात का राकीस?”
सगळेजण शांत झाले होते. कोणी मान वर करुन बोलायला तयार नव्हते.
नाना,”कसला इचार करताय बांडगुळा हो. जावा पटदीशी आप्पा मांत्रिकाला बोलवा गावातुन. साप, ईचु त्यो उतरावतो म्हणत्यात”.
उत्तम,”आवं पण अजुन इंदलकर नाय आलं. मुकादम बी न्हाय”.
नाना, “आरं मालक आन मुकादम आल्यान काय अर्जुना उठुन बसणारे व्हय”.
सगळ्यांना नानाचे बोलणे पटले. पटकन सायकल काढुन एक सालदार आप्पा मांत्रिकाला आणायला गेला आणि नाना अर्जुनाच्या तोंडावरच्या माश्या हटकत राहीला.

अतिशय मळलेले पंचासारखे नेसलेले धोतर, पांढ-या रंगाची कोपरी. दंडाला लाल-भगव्या रंगाचे धागे बांधलेले. गळ्यात कवड्यांच्या आणि रुद्राक्षाची माळ. काळ्या दो-यात बांधलेल्या छोट्या-छोट्या पेट्या गळ्यामधे लटकत होत्या. खुरटी दाढी आणि ओठ-तोंड पान-सुपारीमुळे पुर्ण लाल. डोक्यावर तेलकट गांधी टोपी आणि कपाळावर गुलाल आणि बुक्क्याच्या पट्ट्या. वय थोडं जास्त झाल्याने कमरेत झुकुन झपझप चालत हातात पिशवी आणि गाडगं घेऊन आप्पा मांत्रिक आला. अर्जुनाकडे न जाता सरळ त्याच्या
आई-बापाकडे गेला. त्यांच्या अंगावरचे रग ऊचलुन कुठे-कुठे काय बघत होता ते कोणालाही कळाल नाही आणि पटकन अर्जुनाकडे आला, त्याचे पाय नीट बघत आपल्या घोग-या आवाजात बोलायला सुरवात केली,”आर…आर..! गड्या हो. हे काय साध सुध दिसत नाय. वेगळच जनवार दिसतया”.
नाना, “आप्पा महाराज,किडूकच होत. आम्ही सगळ्यांनी बघीतलया”.
आप्पा,”व्हय रं बाबा. सापच हाये पण ह्यो बांधावरचा दिसतुया. चुकलया काय तरी. सा-या घरादारावर ऊठलया.”
नाना आश्च्यर्याने,” बांधावरचा म्हंणजी? म्हसुबाचा म्हणताय काय?”
आप्पा,”व्हय म्हसोबा. बांधावरचा म्हसोबा. काय तरी द्वाड केलया त्याला तुम्ही”.

आप्पानी अर्जुनाला ऊचलले आणि ’उगवती-मावळती’ कडे पाय आणि डोके केले. पिशवीतुन अंगारा काढला. अर्जुनाच्या कपाळाला लावला. नाकापुढे धरला.अर्जुनाचा श्वास चालु होता. गाडग्यात हात घातला आणि तोंडातली तोंडात मंत्र म्हणायला लागला आणि जोरात ओरडला “यस देर भैरवनाथाऽऽऽऽ”.
गाडग्यातल पाणी एका हातात घेतल. अर्जुनाच्या ओठावर त्या पाण्याचे थेंब पाडले. आपल्या एका हाताने अर्जुनाचे तोंड जबरदस्तीने उघडुन हातातले पाणी तोंडात सोडले. ओला हात अर्जुनाच्या तळव्याला आणि पायाला काहीतरी पुटपुटत चोळला. आपल्या दंडाचा एक लाल दोरा काढला आणि पिशवीमधून एक छोटी तांब्याची डबी बाहेर काढली. डबीमधून सापाची कात काढली आणि त्या लाल दो-यामधे बांधली. तो लाल दोरा अर्जुनाच्या ज्या पायाला साप चावला होता त्या पायाच्या मांडीला आवळुन बांधला, आप्पा मोठ्याने बोलु लागला,” म्हसोबाचा आणि भैरवनाथाचा निवद करा. आंड, चिलीम, भात, गुळ, त्याल,शेंगदाणं घेउन या”. असं म्हणत आप्पाने एका पुडीतुन कुंकु हातावर घेतले.
अर्जुनाला कुंकु लावलं. चारही बाजुला फुंकलं आणि अर्जुनासमोर डोळे मिटुन काहीतरी पुटपूट्त बसला.नाना आणि दोन-चार बायका खोपटांमधे गेले. आप्पा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळा नैवेद्य गोळा करुन आणला. सगळेजण अर्जुनाकडे आणि आप्पाकडे टक लावून बसले होते पण दोघांच्या मुद्रेमधे काहीच फरक नव्हता. फरक होता तो फक्त म्हणजे अर्जुन हळुहळु काळसर होत चालला होता. काही वेळाने आप्पाने डोळे उघडले आणि अर्जुनाकडे बघितले. पुन्हा पहिल्याप्रमाणे पाणी पाजले. अर्जुनाच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसला आणि घाई करायला लागला, “गड्या हो! चला लवकर. निघा. कोणत्या बांधावर म्हसोबा हाय तिथं चला. ह्या पोराला बी घ्या”.
सगळ्यांमधला एकजण म्हणाला, “मागच्या हाप्त्यात धाकल्या मळ्यात परश्यान नांगर चालवला तवा त्यानी बांधावर नांगर घातला आणि म्हसुबाला मातीखाली गाडला. तव्हाच म्या त्याला म्हणल व्हतं. बांधावरचा देव हाय. कोपल. पण खोपडीच्या नशेत गड्याने थट्टा केली”.
नाना,” चला बीगीबीगी धाकल्या मळ्यात. पोराला ठेऊ तिथं. घाराण ऐकतुच की देव.”

अर्जुनाला नानाने पाठीवर घेतले होते. त्याच्या जोडीला आप्पा मांत्रिक चालत होता आणि त्यांच्या मागे सगळी वस्ती चालत होती. सगळ्या बायका वस्तीवरच थांबल्या. तेवढ्यात इंदलकराला आणि मुकादमाला बोलवायला गेलेले गडी सगळ्यांच्यात सामिल झाले आणि म्हणाले, “मालक त्याच्या बारक्या पोराला घेऊन कुठतरी गेल्यात. मुकादम म्हणाला व्हा पुढ. आलुच”.
सगळी वस्ती धाकल्या मळ्याची ढेकळ तुडवत आणि ठेचकळत चालत बांधावर पोहचले. जाणकरांनी म्हसोबाची जागा शोधली. ढेकळांखालून म्हसोबाची शेंदुर लावलेले दगड बाहेर काढले. पाणी टाकल. चिलीम ठेवली. तंबाखु भरली. अंड ठेवल. तेलाच दिवा लावला. भात ठेवला आणि त्याच्या समोर अर्जुनाला झोपवले. नानाने म्हसोबाला लोटांगन घातले आणि म्हणाला, “म्हसोबाच्या नावान चांगभलऽऽऽऽ. चुकलं-माकलं पदरात घ्या देवाऽऽऽऽ. बारक्या जिवाला सोडा. पोराच्या नावानं कोंबड चढवतो पण आई-बापाच पाप पोराच्या टाळूवर नका मारु देवा. येत्या आमुश्याला कोंबड लावतो देवा”
थोडावेळ लोटांगण ठेऊन नाना ऊठला आणि आप्पाने सुध्दा नानासारखीच देवाची प्रार्थना केली. सा-या वस्तींच्या पुरुषांनी पाया पडायला सुरुवात केली. तिथेच सगळे बांधावर अर्जुनाकडे बघत बसले. आता मात्र वेळ बराच झाला होता. सकाळच ऊन चांगलच तापायला लागलं होत. सगळ्यांच्या कपाळातुन घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या पण नजरा मात्र अर्जुनावर खिळल्या होत्या. अर्जुनाची हालचाल कमी झालि होती आणि तापत्या ऊन्हामुळे मानेला झटके द्यायला अर्जुनाने सुरुवात केली होती. आप्पा ऊठला आणि बोलु लागला,”गड्या हो! देवाच्या मनात काय हाये कळत नाय. पोराला भैरोबाच्या गाभा-यात सोडु. शेवटाला सा-या गावाचा, देवाचा आणि राना-मळ्याचा राजा त्योच्च”.

नानाने अर्जुनाला खांद्यावर घेतले आणि सगळे पुन्हा सार रान तुडवत कच्च्या रस्त्याला लागले. वेगाने गावात भैरोबाच्या देवळाकडे जायला निघाले. देवळापुढे गेले. आप्पाने आणि नानाने अर्जुनाला भैरोबाच्या त्या अंधा-या गाभा-याकडे नेले. भल्या मोठ्या मंदीरामधे काळ्याकुट्ट अंधाराने गच्च भरलेला गाभारा. तीन फुटाच्या दगडी चौकटीचा दरवाजा ओलांडून एक फुट खाली उतरले की गाभा-याची थंडगार फरशी पायाला लागली. सा-या गाभा-यात तेलकट वास सुटला होता. भैरोबाची मूर्ती मंदिरात कुठे आहे ते त्या भयाण अंधारात समजत नव्हत.गाभा-यातल वातावरण ब-यापैकी थंड होत तरी सुध्दा नानाचे कानशील गरम झाले होते.त्याची धडधड वाढली होती. आप्पा आणि नाना दोघही त्या अंधा-या गाभा-यात चाचपडत होते, एकमेकाला धडकत होते आणि त्याच अवस्थेमधे अर्जुनाला संभाळत होते. आप्पाने आपल्या कोपरीतुन कड्याची पेटी काढली आणि पेटवली. त्याच प्रकाशात भैरोबाचा दिवा शोधला. त्यात तेल घातल. जुनी वात पुढे सरकवली आणि पेटवली. अंधा-या गाभा-यात अंधुक प्रकाश झाला. हा मंद प्रकाश मात्र भिती दाटवत होता. ह्या अंधुक प्रकाशात भैरोबाची काळ्या पाषाणातली ऊभी दोन फुटाची मूर्ती दिसत होती. त्याच्या समोर पडलेल्या खोब-यच्या आणि गुळाच्या तुकड्यांवर मुंगळे फिरताना दिसत होते. देवाचे पाय नानाने धुतले आणि त्याच चौथ-यावर अर्जुनाला झोपवला. नाना देवासमोर आता जोरजोराने रडायला लागला. रडतच नाना अर्जुनासाठी जीवदान मागत होता. अर्जुनाचा श्वास चालु होता. आप्पाने नानाला बाहेर पाठवले. पाच मिनिटांमधे आप्पा बाहेर आला.

सगळेजन हात जोडुन कोणी मांडी घालुन तर कोणी दोन पायावर मंदीरामधे बसले होते. अर्जुना गाभा-यात भैरोबाच्या पायाशी विसावला होता. आतमधे फ़क्त काळ्या पाषाणातील भैरोबा आणि काळा पडत चाललेला अर्जुन दिव्याच्या अंधुक प्रकाशात दिसत होते. सर्वजण खाली मान घालुन बसले होते. आप्पा गाभा-याकडे बघत होता. नानाच्या दोन्ही डॊळ्यातुन पाण्याच्या धारा चालु होत्या. बरेच जण मात्र आपली मळ्यातली काम रखडली ह्या विचारात होती. बराच वेळ झाला मंदिरात अजून शांतता होती. सगळ्यांचे लक्ष एका आवाजाने वेधले. फटफटीचा आवाज येत होता. मालक येत असल्याची चाहुल सगळ्यांना लागली. सगळेजण मनातून सावरुन बसले आणि नजर गाभा-याकडे लावली. फटफटीचा आवाज स्प्ष्ट होत गेला आणि तो अगदी जवळ येऊन थांबला. मालकाची फटफटी मंदिरासमोर येऊन थांबली. सगळेजण उभे राहीले. फक्त नाना आणि आप्पा जिथे होते तिथेच बसुन राहिले. मालकाच्या मागेमागे स्वत:चे कपडे सावरत रंगीत पँट शर्ट घातलेला मुकादम गडबडीने पुढे येत होता. दणकट शरीरयष्टीचा, घोळदार पायजमा आणि पांढ-या खादी शर्टामधे रुबाबदार चाल ठेवत इंदलकर एकाहातात छोटी बॅग आणि गाडीची किल्ली घेऊन मंदीरात आला. गड्यांशी बोलायला लागला. आप्पा आणि नानांनी काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मग त्यांना आपल्या विशेष मालकी आणि करड्या आवाजात त्यांना बोलावले आणि म्हणाला, “आप्पा. किती येळ झाला”.
आप्पा, “पहाटपासुन हाये बहुदा”.
इंदलकर, “मग कस आता?”
आप्पा, “देवालाच माहीत”.
इंदलकर, “ओय नानाऽऽ. परश्याची आणि त्याच्या बायकुची मैत करायला लागंल. मुकादम नानाकडे पैस द्या. नाना दोन दिसात वस्तीवरचा सुताक संपवा. लै कामाचा खोळांबा होतुया”.
मुकादमाने मालकाच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातुन पैसे काढून मोजायला लागला.
नाना, “व्हय जी मालक. आता जीव जायचा म्हणल्यावर…”
नानाच बोलणे मधेच तोडत इंदलकर म्हणाला, “समद माहीती हाये नाना. माझं धाकट पोरग काल खेळताना पडलं, त्याला तालुक्याला दवाखान्यात नेलाय. तिकडच असतु मी सारा हप्ता. मला जास्त येळ नाय लक्ष ठिवायला. त्यामुळं सुताक संपवायचं दोन दीसात.”
नानासह सगळेजण “व्हय मालक” म्हणाले.
नानाच्या मनात विचार आला, ’पैका असता तर आपन आत्ताच अर्जुनाला दवाखान्यात नेला असता. पण म्या पडलो म्हतारा आणि वस्तीत कुनालाच उल्हास नाय’.

तेवढ्यात इंदलकर पायतल्या वहाणा न काढताच गाभा-यापर्यंत हातातली किल्ली फिरवत गेला. आतमधे डोकावले आणि म्हणाला, “आप्पा देतोय का नाय भैरोबा कौल बघा जरा”
असं म्हणून इंदलकर आणि त्याच्या मागोमाग त्याचा मुकादम निघाला. मुकादमाने जाता-जाता दहाच्या नोटांचे बंडल नानाकडे दिले. सगळेजण मालकाच्या मागे चालायला लागले. नाना सोडून बाकीचे सगळे सालदार मनातून खुष झाले होते. मयतीचा-सुतकाचा पैका मालकाने दिला होता. सगळ्यांच्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या पदराची गाठ ज्यामधे परश्याच्या बायकोचे गंठण बांधले होते. गंठण विकून वाटून घेऊ असा विचार सगळ्यांच्याच मनात होता.
इंदलकर गाडी जवळ थांबला. बॅगमधुन कागदात बांधलेला पानाचा विडा काढला. विड्याची अजुन एक घडी करुन पान तोंडात घातले. त्याच कागदावर दोन बोट फिरवून त्याने कागदावरचा जास्तीचा आणलेला चुना उचलला. स्वत:ची जीभ बाहेर काढून तो चुना जीभेच्या दोन्ही कडेला लावला आणि त्या चुन्याचअ आणि विड्याचा तोंडात एक प्रकारचा जाळ करुन इंदलकर सगळ्यांना उद्देशुन बोलायला लागला, “सुताक दोन दिस असलं तरी उद्या रातच्याला चौघं-पाच जण रानात पाण्यावर जा. म्या आता तालुक्याला चाललोय. पोरग हाय माझ तिकड”.
बोलत असताना त्याच लक्ष मंदीरातल्या गाभा-याकड गेलं आणि म्हणाला, “आरं कुत्र चाललय बघा आत. हाकला त्याला”.
मागच्या मागेच भिका गाभा-याच्या दारात गेला आणि कुत्र्याला हाकलून परत मालकाच्या समोरच्या घोळक्यात परतला. मालक निघाला तेंव्हा भिका नानाला म्हणाला,
“नाना दिवा इझलाय वो आतला. दिसत नाय आतमधी काय बी”.
हे ऐकताच नानाच चेहरा जागेवर थिजला. त्याने आप्पाकडे बघितले. आप्पाने स्वत:च्या खिशातली काडेपॆटी नानाला दिली. नानाने हातातले पैसे भिकाकडे दिले. नाना घाई-घाईने गाभा-याकडे गेला. सगळेजण नानाच्या मागेमागे जाऊन गाभा-याच्या बाहेर उभे राहिले. नानाने अंधा-या गाभा-यात प्रवेश केला. काडी पेटवली. दिवा लावला तसा त्या अंधारामधे गंभीर मंद प्रकाश पसरला. काळ्या पाषाणातल्या भैरोबासमोर अर्जुन जसा ठेवला होता तसाच पडला होता. नानाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. अर्जुन थंड पडला होता. नानाने आशेने त्याचा पाय चोळण्यासाठी ऊचलला आणि त्याच वेळेस नानाच्या हातून अर्जुनाचा पाय गळाला. नानाने पटकन अर्जुनाल दोन्ही हातामधे ऊचलला आणि अचानक एखादा बांध फुटावा तसा नाना देवासमोर मोठ्मोठ्याने रडून अर्जुनाचा काय चुकल विचारत होता. आप्पा नानाकडे काडीपेटी देऊन तसाच मागे फिरला होता. लोक त्याला पाठमोरा खाली मान घालुन चालताना पहात होते. अर्जुन सुध्दा गेला होता. नाना दोन्ही हातावर अर्जुनाला घेऊन गाभा-याच्या बाहेर आला आणि सगळ्यांकड बघुन म्हणायला लागला,
“अर्जुन गेला रऽऽऽऽ…. कुणी नका संभाळु ह्याला… त्यानी त्याची सोय केलीया… मलाबी नाय संभाळणार त्यो आता…”
सगळेजण मान खाली घालुन बसले होते; पण ह्या वेळेस सगळ्यांच्याच डोळ्यातुन पाणी येत होतं. गाभा-याच्या दारात शेवटी झाला तो अश्रुंचा अभिषेक आणि गेला तो अर्जुनचा बळी.
सापाचा दंश परश्याच्या घरालाच नाही पण सा-या वस्तीच्या गरिबीला झाला.
हा प्रसंग म्हणजे त्या वस्तीतल्या प्रत्येक सालदार गड्याच्या आयुष्याला झालेला सर्प्’दंश’ होता.

(समाप्त)

धन्यवाद,
______मनस्वी राजन

छोट्या आणि रामा बोकड

एकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे.
आमच्या गावाला शेजारी राहणा-या शेतकरी कुटुंबामध्ये चार गायी होत्या. चारही गायी अगदी मारक्या, पण वयाची ८० उलटून गेलेले आजोबा त्यांच्या जवळ आले की सगळ्याच्या सगळ्या जणी त्यांना चाटायला सुरवात करायच्या. अजब केमिस्ट्री होती त्यांची आजोबांबरोबर. आजोबा त्यांच्या बरोबर बोलायचे सुध्दा “हं….जास्त लाडात येऊ नकोस. लई तशी नख-याची हायेस तु…” , “मला समद कळतया कशासाठी आरडा-ओरडा चाललाय…थोडासुदिक उशीर झाला चा-याला की झाली चालू तुमची बोंबाबोंब..”,”मी गेल्यावर बसा तुम्ही ग्यानबा-तुकाराम करत..”, “ये गं माझी बाय लाडाची ती” असले वेगळे वेगळे संवाद आजोबांच्या तोंडातून येत आणि असा वाटायचं की सगळ्या गाई ते सगळं ऐकतात सुध्दा.

मध्यंतरी मला एक-दीड वर्ष गावी जाऊन राहावे लागले. येऊन-जाऊन करत होतो पुण्याला पण जास्त मुक्काम गावातच. गाव पुरंदर तालुक्यातल, पुणे जिल्ह्याचचं. गावात बागायती आणि जिरायती अश्या दोन्ही प्रकारची शेती होती. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुध्दा तेवढीच मोठी तफावत होती. श्रीमंत शेतकरी प्रत्येक वर्षी जास्त श्रीमंत आणि गरीब शेतकरी दरवर्षी महागाईमुळे जास्त गरीब. ब-याच गरीब शेतकरी बायका रोजावर (रोजंदारी) गावातल्या शेतक-यांच्या शेतात कामाला जायच्या. पंचवीस रुपये रोज होता तेव्हां त्यांना. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अश्या वेळेत त्यांची कामे चालायची. पहाटे उठून, स्वयंपाक करून, स्वत:च्या शेतातील काम उरकून ९ वाजता
दुस-याच्या शेतात कामाला रुजू.

आमच्या शेजारी एका पडक्या घरात असेच एक कुटुंब होतं. नाकर्त्या पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती सकाळपासून हातभट्टीच्या गुत्त्यावर रिघ लावून बसायची; त्या गर्दीतच त्या काकूंचा नवरा असायचा. काकूंना दोन मुलं. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी मोठी होती आणि मागच्याच वर्षी तीचं लग्न झाले हो्ते आणि मुलगा तालुक्याच्या गावाला बारावीला जात होत.”छोट्या” म्हणायचे सगळे त्याला. पोरगं तसं चुणचुणीत, गोरंपान, अगदी लहान शरीरयष्टी, मला तर पहिल्यांदा तो आठवी-नववीचा विद्यार्थी वाटला. मी त्याला माझी सायकल दिली होती पुण्यातून आणून. कारण घरात माझी बढती बाईकवर झाली होती. सायकल चालवतच तो जवळच्या एका गावात आणि तिथून एसटीने तालुक्याला जायचा. त्याच्या गावातून सात किलोमीटरपर्यंत तो सायकल चालवत जायचा. एका बाजूने पूर्ण चढ आणि एका बाजूने उतार. एवढासा जीव कशी काय सायकल तिथपर्यंत चालवत असेल याचं मला नेहमी कौतुक वाटायचं. ह्या दिड वर्षात मी त्याच्या अंगावर कॉलेजात जाताना एकच शर्ट बघितला आणि एकच प्यांट. पायात पांढरी-निळी स्लीपर, केसांचा कोंबडा करायची हौस होती त्याला. एकटा घरी असला की आरश्यासमोर उड्या मारून आपले केस हवेत उडतात का ते पहायचा आणि सारखा कंगवा हातात ठेवायचा. दिड वर्ष एकच ड्रेस कॉलेजसाठी? खरंतर अश्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्मच बरा. असो…

त्याची आई बिचारी जबरदस्त कष्टाळू बाई. दिवसभर कष्ट ते सुद्धा अक्षरशः गुरासारखे. तिचा दिवस मात्र खूप जास्त भयानक अवस्थेमध्ये संपायचा. रात्री नवरा दारू पिऊन यायचा आणि मग छोट्याची आणि त्याच्या आईची बराच वेळ रडा-रडी सुरु व्हायची, नवरा शिव्या देत राहायचा आणि दारूच्या नशेत मारहाण सुध्दा करायचा. ठराविक वेळेत हा गोंधळ नाही थांबला की शेजारच्या म्हाता-या बायका यायच्या, मध्यस्थी करायच्या आणि सगळा गोंधळ थांबवायच्या. बाहेर येताना एखादी
म्हातारीतरी म्हणायचीच “काय पोरीने पाप केलया म्हणून तिच्या नशिबी असला राक्षस नवरा दिलाय देवानं” असाच एका रात्री खूप गोंधळ चालू होता. नवरा बेदम मारहाण करत होता तिला. मला वाटल मी जाऊन मध्यस्थी केली पाहिजे. छोट्या मोठमोठ्याने ओरडत होता. काळजाचा अगदी थरकाप उडाला. हातातील पुस्तक खाली ठेवले आणि चप्पल घालून तडक त्यांच्या घराकडे निघालो; लगेच वाटेत शेजारी राहणारा चंदू शेठ आडवा आला; त्याने मला त्या घरात जाऊ दिलं नाही. “जाऊ नका तिथे नाहीतर अजून गोंधळ होईल” असे सांगितले. चंदूशेठच स्वत:चं सरकारी स्वस्त धान्य दुकान होतं. त्याने मला सांगितलं “मी बी असाच एकदा तडा-तडा घरात गेलो आणि छोट्याच्या बापाला घरातून बाहेर आणला. मला वाटला झाल आता समदं बैजवार (व्यवस्थित). पण कशाचं काय राव, मी तिथून जाताच त्या बाबाने जे काय त्या बाईला झोडली की ईचारू नका. तो म्हणायचा तुझं आणि त्या चंद्याशेठच काहीतरी लफडं हाये. म्हणूनच घरात घुसला माझ्या. बाऽ बाऽ बाऽऽ तव्हापासून कानाला खडा…आपल्या समजुतीमुळे त्या माउलीचा जीव जायचा. जावा,पडा निवांत घरात.तुम्ही तर पाव्हण्यासारखं आहात गावात..कशाला बरामत घेता अंगावर”.
मी हे ऐकून अक्षरश: गोठूनच गेलो. आणि मला हे सुद्धा कळालं फक्त बायकाच का जातात ह्यांच्या घरात हा गोंधळ मिटवायला. रोज जवळ-जवळ असाच शेवट व्हायचा दिवसाचा. पहाटे ४ वाजता छोट्याची आई अंघोळ करून औदुंबराच्या (उंबर) झाडाला पाणी घालताना दिसायची ते ही अगदी वेगात. तिची सगळीच काम खूप वेगामध्ये तशीच तिची भक्तीसुद्धा. तासाच्या आत छोट्याचा डब्बा आणि नव-याची दिवसभर गिळायची व्यवस्था करून डोक्यावर घमेलं, खुरपं, विळा कधी कधी हातात फावडे, कुदळ घेऊन बाई तरा-तरा साडी आवरत स्वता:च्या मळ्यात निघायची. जाताना बाहेरूनच छोट्याला आवाज द्यायची. “बाळाऽऽऽ उठ लवकर. आज उशीर केला ना कालेजला तर कंबरेत लाथ घालील बघ”. अजून एक वाक्य यायचं ते म्हणजे “हरणीला बाहेर उन्हाला बांध थोड्या येळान”.

“हरणी” हा काय प्रकार आहे हे मला पहिल्या दिवशी कळालंच नाही. त्यांच्या दारात काही गोठा सुध्दा नव्हता की एखादी गाय आहे आणि तीच नाव हरणी असेल. पण ७:३०च्या आसपास छोट्या एक शेळी घेऊन घरातून बाहेर पडायचा आणि त्या शेळीला उन्हामध्ये बांधायचा. लवकर कॉलेजला जायचं असेल तर छोट्या त्या शेळीला “बाय बाय हरणी …!” म्हणायचा आणि स्टाईलमध्ये फ्लायिंग किस सोडायचा. तेव्हां मला कळाले की त्यांनी पाळलेल्या शेळीचे नाव ’हरणी’ आहे. काळ्या रंगाची हरणी आणि तीचे तोंड मात्र संपूर्ण पांढरशुभ्र. जास्त केसही तिच्या अंगावर नसायचे. बरच वयं होत बहुतेक हरणीचे. अगदी तुळतुळीत शेळी मी पहिल्यांदा पहिली आणि ती ही अगदी स्वच्छ. संध्याकाळी कुत्र्या आणि लांडग्यांच्या भीतीने छोट्याची आई हरणीला घरात बांधायची. हरणीचे दूधच ते घरात चहासाठी वापरत. हरणी वर्षातून एकदा यायची म्हणजे तिला पिल्ले व्हायची. विशेष म्हणजे तिला नेहमी तीन पिल्लं व्हायची. शेळीच्या पिल्लाला करढू म्हणतात. नर करढू असेल तर बोकड आणि मादी करढू असेल तर पाठ. अशी ह्यांची नावाने विभागणी होत असते. हरणीला नेहमी तीन करढे होयची. तीन करढे नेहमी व्हायची म्हणून हरणी त्या परिसरात प्रसिध्द होती.

काही दिवसांनंतर हरणीला तीन करढे झाली. २ पाठी आणि एक बोकड. काय झाले कोणास ठाऊक पण २० दिवसात दोन्ही पाठी मेल्या आणि राहिला जिवंत तो फक्त बोकड. हरणीमधे काही तरी जबरदस्त बदल आला. ती तिच्या पिल्लाला म्हणजे बोकडाला अजिबात जवळ करत नसे आणि त्याला दूध सुध्दा पिऊ देत नसे त्यामुळे बोकड उपाशी राहायचं आणि सकाळी लहान बोकड ओरडत बसायचं. महिन्याचं होऊन गेला तरी बोकड ७ दिवसाच्या पिल्लासारखं दिसायचं. छोट्याची आई लहान मुलाच्या दूधाच्या बाटलीमधे दूध काढून घेत असे आणि त्या बाटलीने छोट्या रोज सकाळी घराच्या बाहेर त्या पिल्लाला दूध पाजत असे. ते पिल्लू सुध्दा आईला ढूसण्या मारून दूध प्यावं तस बाटलीमधून दूध पीत असे. छोट्याच्या आईने त्या बोकडाचे नाव “रामा” असे ठेवलं. मग काय; तिथून पुढे सकाळी-सकाळी जोपर्यंत छोट्या उठत नाही तोपर्यंत रामा कायम काकूंच्या मागे-मागे फिरायचा. काकू सुध्दा त्याच्या बरोबर बोलायच्या रामा ब्यांऽऽऽ ब्यांऽऽऽ करत त्याच्यांशी गप्पा मारायच्या. छोट्या उठला की लगेच त्याचा एका जुना शर्ट रामाला गुंडाळायाचा. मग सगळीकडे रामा आणि छोट्याची जोडी इकडे-तिकडे उड्या मारत फिरायची. रोज थोडी गव्हाची कणिक छोट्याची आई ठेवायची, त्याच्या गोळ्या करून छोट्या रामाला खायला घालायचा. शेतावर काकू कामाला जाताना हरणीला हातात आणि रामाला टोपलीत ठेऊन ती टोपली डोक्यावर घेऊन शेतावर जायच्या. छोट्या कॉलेजवरून येता येताच जिथे कुठे त्याची आई कामाला आहे तिथे जायचा आणि रामाबरोबर खेळतखेळत घरी यायचा. रामा मोठा होत होता पण थोडा अशक्तच; त्यामुळे त्याला बोकडाचा वान नव्हता. रंगाने तांबडा अगदी तुळतुळीत. बारीकसं तोंड आणि जागेवर कायम उड्या मारत राहणे, छोट्या कुठूनही नजरेत दिसला की लगेच ओरडायला सुरवात आणि त्याच्याकडे पळत जायचा, छोट्याही त्याच्याकडे बघत बघत रामा सारखाच उड्या मारत त्याच्यापर्यंत यायचा. रामा हरणाच्या पिल्लासारखा दिसायचा.शेजा-यापाजा-यांमधे रामा बोकड आणि छोट्याची मैत्री चर्चेत होती. रात्री झोपताना सुध्दा छोट्या त्याला स्वत:च्या गोधडीमधे धरून ठेवायचा. छोट्याला कधी त्याच्या मुताची घाण आली नाही की त्याच्या लेंड्यांची किळस वाटली नाही. जिथे-जिथे छोट्या जाईल तिथे त्याच्या मागे-मागे रामा असणारच. नंतर काही दिवसातच छोट्याने रामाला बुक्का लावायला सुरवात केली त्याच्या गळ्यात गंडे घालायचा. स्वत:च्या अंग्ठ्यामध्ये काळा दोरा घेऊन रामासाठी जाड असा गोफ बनवला होता. घुंगरू होते. माझ्या आयुष्यात मी कधी बोकड किंवा शेळ्यांचे कधी परिक्षण केले नाही कारण कधी त्यांच्यात विशेष असे काही वाटले नाही. पण रामाची बात काही औरच होती आणि त्याच्या जोडीदाराची सुध्दा. शेजारी-पाजारी सुध्दा रामाकडे पाहून अगदी नेहमीप्रमाणे बोलायचे “कसं वेगळंच करढू आहे” सगळे म्हणायचे.”वान कसा हरणासारखा आहे आणि नेमका त्याच्या आईचे नाव सुध्दा हरणी आहे. हाय का नाय योगायोग”. छोट्या त्याची साफ-सफाई करायचा खूप स्वच्छ आणि खूप चकचकित असायचा रामा.

एक दिवस हरणीने व्यवस्थित दूध दिले नाही म्हणून छोट्याने जास्त प्रमाणात कणिक खायला घातली. रात्रीपासून रामा थोडा नरमला होता. जास्त उड्या मारत नव्हता, नंतर त्याला जुलाब चालू झाले होते (तिथल्या ग्रामीण भाषेत ढंढाळी लागणे). पार अर्धजीव झाला होता रामा. छोट्याचा जीव सकाळ होईपर्यंत कासावीस झाला. रात्रभर छोट्या काही झोपायला तयार नाही. त्याच्या आईने सांगितले “सकाळी डेअरीवर जाऊन डॉक्टर घेऊन येऊ,आता झोप.काही नाही होत. ढंढाळी लागत असते शेळ्या-करढाना”. गावातले शेतकरी सकाळी गावातल्या चावढीपाशी दूध घेऊन यायचे. तिथे सगळं दूध जिल्हा दूध संघामार्फत गोळा केले जायचे. मोठी उलाढाल होती ह्या धंद्याची. तिथे बरेचशे शेतकरी चांगल्या शेतक-यांना सल्ले विचारात असे,”काय पेरलं पाहिजे”,”कोणत औषध मारलं पाहिजे”,”बाजरीचा कोणत वान घेतला पाहिजे”, असे बरेच काही. मी सुध्दा रोज सकाळी पेपर आणायला जायचो. तिथेच आजूबाजूच्या गावाचे व्हेटरनरी (veterinary) डॉक्टर्स बसलेले असतात. ज्यांच्या गुरा-ढोरांना, प्राण्यांना काही प्रोब्लेम असेल तर शेतकरी त्या डॉक्टर्सना आपला पत्ता देतात आणि मग डेअरीची वेळ संपल्यावर ते डॉक्टर्स सर्व जमलेल्या पत्त्यांवर जातात.
छोट्या एका डॉक्टरकडे गेला आणि त्याला सांगितलं “आमच्या बोकडाला ढंढाळी लागली आहे, तुम्ही त्याला बघा”.
डॉक्टर उलट त्यालाच म्हणाले” अरे बोकाडच ते.;काही खाल्ल असल होईले ठीक”.
बोकडासारख्या छोट्या प्राण्याकडे डॉक्टरला पाहायला वेळ नव्हता. दुस-या डॉक्टरकडे जाऊन छोट्या अगदी रडव्या स्वरात सांगत होता “चलाना आमच्या घरी”.
त्या डॉक्टरने सुध्दा त्याला झिडकारलं होतं. मग छोट्याच्या शेजारच्या एका माणसाने डॉक्टरला सांगितलं “आहो माझ्या गाईला बघायला येताय तर मग तुम्ही तवा घ्याकी बोकडालाबी बघून. लई जीव हाय पोराचा त्याच्यावर आणि बोकाड सुध्दा अस हाय ना.! की बास. असलं जीतराफ (शेतक-याचे पाळीव प्राणी) तुम्ही सुध्दा कधी बघितला नसल”.
डॉक्टरने छोट्याला सांगितलं “टाकतो चक्कर.तु हो पुढे. मी येतो तासभरात”.
तो डॉक्टर छोट्याच्या घरी आला, तेव्हा छोट्या चुलीसमोर रामाला मांडीवर घेऊन बसला होता. डॉक्टरने बोकडाला पहिला आणि एक भली मोठी गोळी त्याच्या तोंडात घातली अन म्हणाले “होईल बरा संध्याकाळपर्यंत”.
छोट्याने लगेच बोलायाला सुरवात केली,”एवढी मोठी गोळी कशाला घातली तोंडात त्याच्या. तुकडे करून पिठातून दिली असती मी त्याला.आधीच त्याच्या पोटात गडबड आहे, त्यात एवढी मोठी गोळी”.
डॉक्टर म्हणाले, “कणिक ह्याच्या तब्बेतीला चांगली; पण जास्त घालू नका खायला, पचवायला जड जातंय त्याला “.
“लगेच बरा होईलना आता तो, सकाळ पासून आवाजसुध्दा नाही काढला बाहेर त्याने, खेळतपण नाही”. छोट्या रडवेला झाला होता.
डॉक्टरला सुध्दा हे प्रकरण थोडं वेगळं वाटले.
डॉक्टर- “वयाच्या मानाने तुमचा बोकड बराच लहान आहे. ठेवण्यापेक्षा देऊन टाका खाटकाला; असाही आखाड चालू झाला आहे”.
छोट्या लगेच ताडकन उठला आणि रामाला जाऊन पकडलं “आम्ही नाही विकणार रामाला खाटकाला. आईगं आपण नाहीना विकणार रामाला?”.
छोट्याचे वडिल-”त्याला ठेऊन काय गावावर सोडायचा का उडवायला”.
छोट्याला काही अर्थ कळला नाही त्याचा “मी नाही विकू देणार त्याला”
अस म्हणत त्याने रामाला उचलला… रामाने सुध्दा त्याच्या छातीवर मान टाकली. ती सुध्दा अगदी प्रेमाने. छोट्या रडायला लागला होता..
छोट्याची आई-”किती झाले डॉक्टर साहेब तुमचे? आमच्या पोराला लागलय त्या बोकडाच याड”.
डॉक्टर-”माझे काहीनाही झाले. नको मला पैसे. पहिल्यांदाच बघतोय बोकाडावरच प्रेम. कुत्र्या मांजरावर सुध्दा एवढ आजकाल कोण जीव टाकत नाय. तुमच्या रामा आणि छोट्यासाठी माझ्याकडून पैसे माफ” असे म्हणून डॉक्टरने आपल्या एम८० ला किक मारली आणि निघून गेले.

रामा आता परत उड्या मारायला लागला. छोट्या सकाळी त्याच्या बरोबरच कसला तरी पाठांतर करत होता. बहुतेक परीक्षा होती त्याची कसलीतरी. दारासमोर वही घेऊन येरझ-या घालत छोट्या वाचायचा आणि रामा त्याच्या मागे-मागे येरझ-या घालायचा. छोट्याच्या घरात ब-यापैकी अंधार असायचा आणि रात्र झाल्याशिवाय दिवा लावायचा नाही, हा त्याच्या आईचा नियम होता. घरात फक्त एक बल्ब आणि एक जुना टेबलफॅन तो सुध्दा छोट्याच्या वडिलांसाठी. तरीसुध्दा विजेचा वापर बिलाचा विचार करून कमीच. त्यामुळे छोट्या दारासमोरच अभ्यास करायचा आणि त्याच्या मागे-मागे रामा, जवळच्या रस्त्याने जाणा-या एका मुलांच्या घोळक्याने छोट्याला आवाज दिला आणि रामाला त्याच्या बरोबर पाहून सगळे म्हणायला लागले.”छोट्या माकड आणि रामा बोकड”,”छोट्या माकड आणि रामा बोकड”,”हय..छोट्या माकड आणि रामा बोकड”. छोट्या त्यांना सगळ्यांना जोरात “हाड हाड” म्हणाला आणि आपल लक्ष परत रामावर आणि अभ्यासात घातलं.

एक दिवस सकाळी-सकाळी एक भला मोठा काळाकुट्ट माणूस छोट्याच्या घरी आला होता. छोट्याच्या वडिलांनी त्याला बोलावलं होते. पायजमा, लाल भडक रंगाचा शर्ट, हाताच्या बोटांमध्ये जाड-जाड अंगठ्या. राजदूत गाडीवर फट-फट करत आमच्या घरासमोर गाडी लावली. माझ्याकडे बघत तोंडातली तंबाखू आमच्याच घराच्या भिंतीवर टाकली. दिसायला अगदी फिल्मी खलनायकासारखाच. त्याचा एक डोळा सुध्दा बारीक होता. बहुतेक तो कामातून गेलेला असावा. लांब पण पातळ केस, मागे सरकवलेले आणि पायात त्याच्या वजनाला शोभतील अश्या वजनी वहाणा. जोरात छोट्याच्या वडिलांना आवाज दिला. वडिल बाहेर आले. छोट्याची आई आली. छोट्या आपल्या फाटक्या बनियन आणि जुन्या शाळेच्या खाकी चडडीवर बाहेर आला. छोट्याच्या वडिलांनी नमस्कार केला आणि छोट्याच्या आईला सांगितलं की आलेली व्यक्ती ही खूप मोठा खाटिक आहे. नाव त्याच संपतराव होतं. छोट्याच्या आईला आपल्या नव-याने खाटकाला घरी कशाला बोलावलं ते लगेच कळालं. रामाला विकायचा बेत होता. तिने तिथेच सुरवात केली, “हे बघा जे काही पैसे येतील ते मला पाहिजेत. मला झेंडूची रोप आणायची हायेत शेतात लावायला”.
छोट्याचे वडिल “हा हा मला माहिती हाये. त्यासाठीच बोलावलं हाये मी ह्यांना.”
खाटिक- “कुठाय बोकाड, बघू जरा”.
छोट्याला हा काय प्रकार चालला होता ते कळत नव्हतं. तो हरणीला पिठाचा चाळ खायला घालत होता. त्याच्या मागेच रामा होता. छोट्याच्या आईने पटकन येऊन रामाला उचल आणि खाटकासमोर ठेवला. लगेच छोट्या खाटकापर्यंत गेला. खाटिक खाली वाकला आणि रामाच्या मानेच्या थोडे मागे आणि पाठीच्या थोडासा पुढे एक हाताने जोरात दाबलं. रामाने मोठा भयंकर आवाज काढला. रामा तडफड करायला लागला. छोट्याला काय ते पाहवलं नाही “ओऽऽऽऽऽ.. सोडा त्यालाऽऽऽऽ”.
त्या खाटकाला रामा सारखीच छोट्याने ढुसनी दिली आणि रामाची सुटका केली.रामा जोरात पळत-पळत हरणीच्या तिथे गेला. त्याचा भयानक आवाज ऐकून हरणी ओरडायला लागली होती. खाटकाला छोट्याचा राग आला. पडला असता तो जोरात. पण सावरला
संपतराव- “मांद नाय हो बोकडात तुमच्या. किती द्यायचे तुम्ही सांगा. ४-५ महिन्याचा म्हणताय तुम्ही पण बोकडात काय दम नाय. अजिबातच मांद नाय. भरलंच नाय ते” (मांद म्हणजे एकंदरीत प्राण्याच्या अंगात असणारे मांस)
छोट्या- “नसुद्या मांद, आम्हाला नाय विकायचा रामाला”
छोट्याचे वडिल- “थोबाड फोडू का तुझं. लै तोंड चालवतोय”
छोट्या जोरजोरात रडू लागला “आई नकोना गं विकू रामाला. हरणी परत याली की ती करढ विक वाटल्यास. रामाला नकोना विकू”
छोट्याच्या आईला छोट्याच्या रडणं आणि अवस्था बिकट वाटली आणि तिला सुध्दा खूप वाईट वाटलं. तोंड पदराने झाकलं आणि हुंदका देताच म्हणाली “तुझ्या बापालाच सांग काय ते. मला तर काय कळाना आता”.
एवढेच म्हणून ती घरात गेली. छोट्याच रडणं चालूच होतं. छोट्याच्या वडिलांनी संपतरावशी बोलायला सुरवात केली.
“संपतराव नका लक्ष देऊ त्या ****कडे. बावळट हाये ****चा. तुम्ही जावा घेऊन बोकाड. सांगा किती होत्यात ते”
खाटिक- “नको मला तुमचं बोकाड. आसं हे जीव असल्याल जीतराफ आम्ही विकत घेत नाय. पोराचा जीव हाये तुमच्या बोकडावर. नको. जीव गुतल्यालं जीतराफ नको मला. लाभत नाय असलं आम्हाला”. असं म्हणून त्याने आपली राजदूत चालू केली आणि निघून गेला. छोट्याच्या वडिलांना छोट्याचा फार राग आला होता.
“घरात चल. साल्टच (चामडी) काढतो तुझं” असे म्हणत, तन-तन करत घरात निघून गेला. छोट्याने मात्र आपला रडणं थांबवलं आणि अगदी खुशीत रामाला जवळ घेऊन बोलायला लागला “नाय विकणार तुला कुणीच. आता नाय विकणार तुला कुणीच” रामा सुध्दा त्याच्या बरोबर उड्या मारायला लागला. हे दृश्य पाहून मला सुध्दा खूपच आनंद झाला. रामा आणि छोट्या खरच खूप खुष होते आणि मला ते माझ्या डोळ्याने दिसत होत. खरंच, सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या भावना असतात. आपण फक्त त्या बघत नाही किंवा ओळखत नाही. छोट्याला येवढा खुश पाहुन रामा सु्ध्दा डोळे विस्फारून छोट्याकडे बघत आनंदाने जागेवरच उड्या मारत होता. प्राणी कोणताही असुदेत त्याच्या भावना समजून घेणं, त्या ओळखणं आणि त्या स्वत: अनुभवनं म्हणजे जबरदस्त अनुभव असतो आणि त्याची मला अनुभूत्ती सुध्दा आली होती.

२-३ महिने झाले होते. छोट्याला परीक्षेमुळे तालुक्याच्या गावात होस्टेलवरच राहायचं होतं. ३-४ महिने छोट्या शनिवारचा घरी यायचा. रामा मोठा झाला होता. पण तो बोकडाचा वान काय अजून आला नव्हता. आता मात्र छोट्याच्या आईने चंगच बांधला होता. रामाला विकायाचाच. छोट्याला एक दिवस बाहेर बसून सांगत होती.
“आता येत्या शनवारी रामाला विकणार हाये”.
छोट्याने खूप आरडाओरडा सुरु केला.
“अरे आपली हरणी परत घाबण हाये. होत्यालाच की तिला करढं”.
छोट्या-”मग ती करढं विकून टाक”.
छोट्याची आई- “आता पैसे लागायचे हाइत घरात. तुझ्या हट्टापायी झेंडू सुध्दा लावता आला नाही. आता गरज हाय पैश्याची. तुझे काय दात पाडून आणायचे का पैसे”. छोट्याची आई आता वैतागाच्या स्वरात बोलत होती.
छोट्या रागाने,” नाय विकायचा रामाला.”
दन-दन पाय आपटत छोट्या रामाकडे निघाला. सोमवारी छोट्या आईला सारखासारखा सांगत होता
“आई रामाला विकू नको बर का”.
आई नाही नाही म्हणत त्याला एसटी स्टँडवर छोट्याला सोडून आली. घराकडे येता-येता मुसलमानाच्या घरात खाटकाला उद्या सकाळीच घरी पाठवायचा निरोप देऊन आली.

दुस-या दिवशी शेजारची जनाकाकू आणि छोट्याची आई खाटकाची वाट बघत बसल्या होत्या. जनाकाकू नावाची आज्जी म्हणजे छोट्याच्या आईचा मोठा मानसिक आधार. छोट्याची आईने रामाचा दोर हातात धरला होता आणि दोन पायावर बसली होती. डोळ्यात चांगलच पाणी तरारलं होतं. जनाकाकू तिच्याशी बोलत होती.
“आग पोरी, शेतकऱ्याच्या आयुष्यात जीतराफच असत्यात. असा शेळा-करढावर जीव लावला तर कस जगता येईल. बोकाड मोठ झालय आता. उडाया बघतय सगळीकड. यवढच वाटतंय तर थांब अजून थोड दिस. तुझी हरणी हायेच घाबण, तिला होतील करढ. मग हे बोकाड इकून टाक.”
छोट्याची आई “तस नाय वो जनाकाकू. मागच्या आठवड्यात पोरीचा फोन आला व्हता शेजारी. ती सुध्दा गरवार (pregnant) हाये. सातवा महिना संपलाय आता. आता पाव्हनं म्हणत्यात की बाळंतपणाला माहेरी जा म्हणून. आता पोरीचा बाळंतपण जरी सरकारी दवाखान्यात केलं तरी खर्च येणारच की वो. कुठून आणू पैसा”.
तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत होते.”मी काय आज करते होय शेळ्या करढाचं पण ह्या पोरामूळं बोकडात जीव अडकला माझा पण. त्याला जर कळालं तर पोरगा अभ्यास पण नाय करायच. रडून-रडून नको करल. लै तरास करून घेता स्वत:ला बोकडासाठी”.
जनाकाकू- “कोनाला कशाची माया लागल सांगता येत नाही पोरी. चांगला जीव लावला बोकडाला. तुझ्या पोरीच्या पोराबाळासाठीच कामाला आला शेवटी. ह्यच बघ कसा देव पण करतो. तुझ्या पोरीच्या बाळंतपणासाठी तुझ्या हरनीच बाळंतपण कामाला आलं. आई अंबाबाई सगळ बघतीया पोरी. उग रडू नगस. काढू आपण छोट्याची समजूत”.
छोट्याची आईने रामाचा दोर जनाकाकूंकडे दिला आणि म्हणाली, “देऊन टाका खाटकाला. मी जाते मागच्या रानात. मला नाय बघवायाचं रामाला आता” .
डोळे पुसत पुसत छोट्याची आई रामा कडे गेली, बारक्या पोराला गोंजाराव तसा रामाला गोंजारलं, त्याला पाणी दिलं. हातातला कणकेचा गोळा दिला आणि तरातरा हरणीला घेऊन निघून गेली.
राम तिच्या कडे बघून ओरडत होता. आज त्याला रानामध्ये चालवलं नव्हतं. जनाकाकूच्या मागून हे दृश्य मी पहात होतो. जनाकाकूचे डोळे सुध्दा पाण्याने भरून आले.
औदुंबराच्या झाडाकडे बघत जनाकाकू म्हणाली, “देवा कसा रं जीव अडकवला तू. तुझी पाटी तुलाच माहिती. लक्ष ठेवरे बाबा”.

काही दिवसांनी माझ्या घरी फोन आला. छोट्याच बोलत होता. त्याच्या आईला मी बोलावून घेतलं. छोट्या आईला मोठ्याने विचारात होता, “आईऽऽऽ..हरणी ला काय झालं…? आणि ताईला मुलगा झाला की मुलगी?”

(समाप्त)

धन्यवाद,
______मनस्वी राजन

Follow

Get every new post delivered to your Inbox.